महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृती
महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये खरंतर निसर्गाचा खूप मोठा वाटा आहे, त्यांना पारंपरिक पद्धतीचे जीवन जगण्यासाठी निसर्गाने मोलाची मदत केली आहे. त्यामुळे निसर्गाने आदिवासी जीवनाच्या विविध पैलूंवर आपला ठसा उमटवला आहे असे म्हणता येईल. निसर्गाशी असलेल्या या विलक्षण नात्याने दऱ्याखोऱ्यात तसेच डोंगरात राहणारा आदिवासी निसर्गाच्या सानिध्यातच स्वत:ला सुरक्षित समजू लागला. म्हणूनच आदिवासींची आपली संस्कृती, राहणीमान यात आपल्याला कमालीचे वेगळेपण जाणवते! ते निसर्गाच्या सगळ्याच रुपांचा आपलेपणाने स्वीकार करतांना आपल्याला आढळून येईल. निसर्गाने सुद्धा त्यांच्यावर मेहरबान होऊन मुक्तपणे उधळण केली आहे. त्यांच्याइतकी निसर्गाची जवळून ओळख शहरात राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना होणे शक्य नाही. निसर्गाने आदिवासींना एका अर्थाने ताजेतवाने राहण्याची शक्ती प्रदान केली आहे.
हजारो वर्षांपासून महाराष्ट्रात सहयाद्रीच्या पूर्व, पश्चिम उतारावर तसेच सातपुड्याच्या रांगांमध्ये आदिवासींचे वास्तव्य असल्याचे आढळून येते. भौगोलिक व नैसर्गिक समस्यांमुळे आदिवासी प्रदेशाचा विशेष विकास होऊ शकला नाही. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही दुर्दैवाने त्यांच्यापर्यंत अत्यावश्यक सेवा, सुविधा पोहचल्या नाहीत. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा सुद्धा त्यांच्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. मात्र आदिवासी बांधवांना निसर्गाने मायेने सांभाळले आहे.
सातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये भिल्ल, कोकणा गावीत, दुबळा, कोरकू, धानका, तडवी, अशाप्रकारच्या जमाती वास्तव्य करून आहेत. यात विशेषतः महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, औरंगाबाद, अमरावती या जिल्हयांचा समावेश होतो. विदर्भातील डोंगराळ आणि जंगलमय प्रदेशात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, मेळघाट याठिकाणी गोंड, माडिया, कोरकू, कोलाम, परधान, आंध या जमाती राहतात.
आदिवासींचे जीवन म्हणजे त्यांचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन जवळून बघितल्यानंतर ते आपल्यासारख्या समाजातील माणसांपेक्षा प्रेमळ, मायाळू, तसेच प्रामाणिक, भोळे आणि दुसऱ्यांवर सहज विश्वास ठेवणारे, माणूसपण जपणारे आढळून येतील हे आवर्जून नमूद करावेसे वाटते! त्यांच्यात मानवतावादी सत्य सत्प्रवृत्ती सुध्दा बघावयास मिळते. मात्र दुर्दैवाने पौराणिक कथांमधून आदिम जमातीबद्दल त्यांची निर्दयी क्रूर अशी प्रतिमा रेखाटली असल्याचे दिसून येते, आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा समजून था घ्यायची असल्यास त्यांचे निरनिराळे सण, समारंभ आपण समजून घेतले पाहिजे. आदिवासी जमात कला आणि मनोरंजनप्रिय आहे. त्यांची नाचगाणी व सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक सणांशी निगडीत आहेत. सुगीच्या दिवसातील त्यांचे सण म्हणजे त्यांच्यासाठी एकप्रकारचा आनंदोत्सवच असतो. कथा, किस्से सांगण्याची प्रथा आपल्या मानवी समाजात अगदी आदिम काळापासूनच चालत आली आहे. आदिवासी समाजात धार्मिक प्रसंगी कथा सांगणे, प्रसंगाला अनुसरून उखाणे, म्हणी यांचा वापर करणे या बाबींना अतिशय महत्व आहे. तसेच त्यांच्या समाजजीवनात लोकसाहित्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.
दुर्दैवाने आजही आदिवासी समाजाचे अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, बुरसटलेल्या परंपरा इत्यादींनी संपूर्ण जीवनच व्यापले आहे. आपल्या प्रचलित सुधारलेल्या व्यवस्थेमधील तथाकथित लोक त्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेताना दिसतात. आपला समाज त्यांच्याकडे वेठबिगार म्हणूनच पाहताना दिसतो. त्यांचे जीवन समजावून घेऊन आदिवासी जमातीचा, त्यांच्या विदारक वास्तवाचा अभ्यास होणे ही आज खरी गरज आहे. 'सरळपणाने कसे जगावे याचा अनुभव आदिवासींच्या वागणूकीतून मिळतो. खरंतर तेथूनच त्यांच्या एकंदरित समाज जीवनाची सुरूवात होते. नाचगाण्यांच्या कार्यक्रमात तर त्यांचे पाय जणू जमिनीवर थांबतच नाहीत ! त्यांच्या इच्छा आकांक्षांना नवीन पालवी फुटते, अशा प्रसंगात त्यांना वयाचे, स्थळांचे तसेच काळाचेही बंधन नसते. त्यावेळी या आदिवासी माणसांची मने खुल्या दिलाने निसर्गाशी रममाण होतात. अशावेळीच आपल्याला त्यांच्या संस्कृतीचे खरे दर्शन घडते.
आदिवासी लोक हे सहसा रानावनाच्या आसपास किंवा एखाद्या पाणवठ्याजवळ राहताना दिसतात. त्यांना वर्षातून साधारणपणे तीन महिने वीटांच्या भट्टीवर रोजगार उपलब्ध असतो. इतर वेळी ते जंगलातून विडी बनवायला लागणारी पानं (तेंदूपत्ता) खुडणे, लाकूडफाटा जमवणे, बकरी किंवा शेळ्यांसाठी हिरवा पाला तोडून आणणे, मासे पकडणे असे उद्योग करताना आढळतात. एक गोष्ट मात्र खटकते, शासनाने भरपूर संधी उपलब्ध करूनही आदिवासी समाज शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत उदासीन आहे. शासनाने चौथी पर्यंतचे शिक्षण त्यांच्यासाठी मोफत ठेवलेले आहे. वह्या, पुस्तके सुद्धा मोफत आहेत. शिवाय शाळेचा गणवेश तसेच रोजचा पौष्टिक आहारही मोफत आहे. मात्र हे सगळे असूनही आदिवासी लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याबाबत बेफिकिर असल्याचे आढळून येते. आपल्या मुलांनी शिक्षण घ्यायला पाहिजे हा विचारच त्यांच्या मनात कधी गंभीरपणे येत नाही. मात्र काही पालक सोयीस्करपणे मुलांना शाळेत पाठवताना दिसतात... ते यासाठी की, मुले जर नुसतीच खोड्या करणारी असतील तर त्यांना सांभाळणे हे त्यांच्यासाठी कधीकधी दिव्य ठरते. मग अशा मुलांना शाळेत पाठवायची भूमिका ते घेताना दिसतात. दुसरे असे की, आदिवासी मुले बकऱ्या घेऊन चरायला जाणे, लांबून पाण्याचे हंडे भरून आणणे ही कामे करतात. त्यामुळे त्यातून वेळ मिळाला तरच ती शाळेत जाताना दिसतात. अनेकदा तर शाळा चुकवलीच जाते! या आदिवासी मुलांच्या पालकांच्या अजूनही हे ध्यानात येत नाही की आपली मुले शिक्षण घेऊन शहरी लोकांसारख्या नोकऱ्या करू लागतील. एकंदरीत या समाजाच्या शैक्षणिक विकासाला विशेष गती प्राप्त होईल अशी परिस्थिती सध्यातरी नाही!
आदिवासी लोक हे त्यांच्या आरोग्याबाबत मात्र खूप सुदैवी आहेत असेच म्हणावे लागेल. कारण त्यांना मिळणारे नैसर्गिक वातावरण आणि शुद्ध हवा! आपल्याला मिळणारी शहरातील हवा हा आपल्या आरोग्याचा शत्रू नंबर एक आहे, दुसरे म्हणजे पाणी: कालकावरून वाहणारे शुद्ध पाणी त्यांना सहज उपलब्ध होते. मात्र त्यासाठी त्यांना पायपीट करावी लागले. तसेच - चूल पेटवण्यासाठी लाकडे गोळा करताना, शेळ्यांसाठी हिरवा पाला आणताना तसेच रानातून मिळणारे विविध नैसर्गिक खाद्य पदार्थ आणताना त्यांची अखंड कसरत सुरु असते! पायवाट, टेकड्या, घाटरस्ते अशा भागातून ते सतत चालल असतात. कित्येकदा मोळ्या इत्यादी वजन उचलूनही त्यांना चालावे लागते, त्यामुळे त्यांचे शरीर अतिशय काटक असल्याचे दिसून येते.अस्थीरोग किंवा श्वासाच्या तक्रारी, हृदयरोग असे प्रकार त्यांच्यात आढळून येत नाहीत. बराच वेळ अन्नपाण्या शिवाय चालत राहिल्यामुळे त्यांच्या शरीराचा चिवटपणा अत्यंत जास्त वाढलेला असतो. तसेच महत्वाचे म्हणजे आदिवासीचा आहार! आपल्या शहरी आहारात आणि त्यांच्या आहारात खूप मोठा फरक आढळतो. ते लोक मोठ्या प्रमाणात कंदमुळे खाताना दिसतात. आपल्याला शहरात सहसा मिळणार नाही, अशा पालेभाज्यांची त्यांना माहिती असते. त्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात ते खातात. त्यांचे नेहमीचे जेवण म्हणजे डाळ-भात, कंदमुळे आणि एखादी हिरवी पालेभाजी! तसेच त्यांचा मांसाहार म्हणजे जलाशयातून पकडलेले मासे, किंवा इतर जलचर प्राणी, चारों अत्यंत शुद्ध हवा, निर्मक पाणी, निसर्गाच्या सानिध्यातील आहार तसेच कमालीची अंगमेहनत यामुळे आदिवासी लोक आरोग्याच्या बाबतीत शहरी लोकांपेक्षा निश्चितच सुदैवी आहेत. नाही म्हणायला त्यांना सर्दी-पडसे, ताप तसेच सर्पदंश हे प्रकारही होत असतात, मात्र त्याचे प्रमाण कमी असते, माशिवाय आपल्या शहरी वातावरणातील ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा आदिवासी जंगलात नसल्याने त्यांचे मानसिक आरोग्यही उत्तम असते, आणि त्याचा चांगला परिणाम त्यांच्या शारिरीक आरोग्यावर होतो.
स्वच्छतेच्या बाबतीत मात्र हे लोक उदासिन असल्याचे आढळून येते. अनेकदा पाण्याचा असलेला अभाव आणि त्यांचे होणारे स्थलांतर हे त्यामागील कारण असू शकले. त्यांची लहान मुले मातील पडलेले अन्न खाताना दिसतात. कुणाचे नाक वाहताना दिसले, एखाद्याच्या जखमेवर माशा बसलेल्या दिसतात; मात्र त्याकडे कुणाचेच लक्ष नसते, हे लोक आंघोळही पाण्याच्या उपवाब्धतेनुसार करताना दिसतात. सरसकट सगळेच असे अशाप्रकारे वागतात असे नाही. सततच्या अंगमेहनतीमुळे आदिवासींचा रंग रापलेला दिसलो. चेहऱ्यावर सतत गोंधळल्या सारखे भाव दिसतात. मात्र हे लोक अजिबात बावकर नसतात, ते त्यांच्या जीवनात चांगलेच हुशार असल्याचे दिसून येते. रानात कुठे गेल्यावर काय भाजीपाला किंवा कंद मुळे मिळणार हे त्यांना बरोबर कळते. रानातूनच ते झाडपाल्याची औषधेही मिळवतात. आदिवासी समाजाचे एक वेगळेच जग असते... आपल्यासारखे ताण, स्पर्धा, मत्सर, विकार, पैशाचा हव्यास, भय, तांत्रिक विकास, अगतिकता, विकृती, स्वार्थ अशा घटकांचा त्यांच्या ठायी लवलेशही आढळणार नाही. शासनाने या लोकांना काही संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. शिक्षण मोफत आहे तसेच यांना नोकरीसाठी आरक्षणही आहे. उदरनिर्वाहासाठी त्यांना लहानमोठे व्यवसाय उभारण्याची संधी प्राप्त करून दिली आहे, एकाच ठिकाणी राहणाऱ्यांना शासनाने घरकुल योजनेअंतर्गत घरेही बांधून दिली आहेत, मात्र एक महत्वाची आणि मोठी अडचण या लोकांना भेडसावते, ती म्हणजे त्यांच्या नावावरचे आरक्षण दुसरेच कुणीतरी पळवल्याचे आढळून येते अन हे प्रचंड मोठया प्रमाणावर सुरु आहे... घडत आहे! मग या आदिवासींपैकी कोणी खरोखर शिकलेला असला आणि आरक्षण मागायला गेला तर त्या जातीची सर्व आरक्षणे आधीच संपल्याचे त्यांना समजते. नंतर' लक्षात येते, की ज्यांनी ते आरक्षण मिळवले ते आर्थिकदृष्ट्या चांगलेच मजबूत होते. अशावेळी या आदिवासींचा कुणीही वाली नसतो. म्हणजेच शासन यांच्यासाठी काहीतरी चांगले करू पाहात आहे, हे लोक शिकून (काही प्रमाणात ) सुधारू पाहत आहेत, आणि आपल्याकडचे भ्रष्ट लोक त्यांना मिळणारी संधी त्यांच्यापर्यंत पोहचणार नाही यासाठी प्रयत्नशील असतात. हे कुठेतरी थांबायला हवे आणि आदिवासी बांधव मुख्य प्रवाहात सामील व्हायला हवेत असे मनापासून वाटते!
विनोद श्रा.पंचभाई
मो. ९९२३७९७७२५
No comments:
Post a Comment