Sunday, February 22, 2026

वाईट सवय... (बोधकथा)

 वाईट सवय... (बोधकथा)

      पिंटू तसा बालपणापासूनच खोडकर होता. अभ्यासात मात्र तो हुशार होता. थोडा मोठा झाल्यावर पिंटूला जिथं तिथं थुंकण्याची वाईट सवय जडली. घरात असला तरी तो वॉश बेसिनमध्ये थुंकायचा नाही... तर तो घराच्या खिडकीतून, दरवाजातून कुठंही थुंकायचा. त्यामुळे पिंटूच्या या वाईट सवयीवरून त्याचे आईबाबा त्याला सतत ओरडायचे. तरी सुद्धा त्याची ही खोड काही केल्या जात नव्हती.

कुणाला अशी शंका यायची, हा पिंटू गुटखा, सुपारी तर खात नसेल! मात्र तसलं काही नव्हतं. त्याला कुठलंही व्यसन नव्हतं. का कुणास ठाऊक पण कुठंही थुंकण्याची वाईट सवय त्याला लागली होती. रस्त्यानं येता - जाताना किंवा शाळेत वर्गातल्या खिडकीतून पिंटू थुंकला नाही असं कधीही घडलं नाही.

    एकदा पिंटूच्या शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणार होती. त्यासाठी शाळेत वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे पथक आले होते. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली आणि शेवटी त्यांनी सार्वजनिक स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता या विषयावर भाषण दिले. त्यांनी बोलताना रस्त्यावर कचरा, घाण टाकणे, थुंकणे या विषयावरही माहिती दिली. ते म्हणाले, “आपल्यापैकी अनेकांना रस्त्यावर केरकचरा टाकण्याची किंवा थुंकण्याची सवय असते."

डॉक्टरांचे बोलणे ऐकून सगळेच पिंटूकडे बघत खो खो हसू लागले. तेव्हा त्याला मेल्याहून मेल्यासारखं झालं.

नंतर सर्वांना शांत करत डॉक्टर म्हणाले, “अनेकांना सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची वाईट सवय असते. रस्त्यावर थुंकल्यामुळे परिसरात घाण, दुर्गंधी पसरते. थुंकीवर माशा बसून रोगराई पसरण्याचा धोका संभवतो. पावसाळ्याच्या दिवसांत थुंकीच्या घाणीपासून साथीचे रोग पसरण्याचाही धोका असतो. तेव्हा तुम्ही प्रत्येकाने आपल्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे."

डॉक्टर पुढे म्हणाले, “आता तर आपल्या राज्यात शासनाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार कुणी रस्त्यावर थुंकताना आढळल्यास एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षाही निश्चित केली आहे.''

डॉक्टरांचे भाषण ऐकून पिंटूला थुंकणे किती घातक असते ते समजले. मात्र त्याची थुंकण्याची सवय सुटता सुटत नव्हती. त्यामुळे तो खूप उदास राहू लागला. 

      दिवस असेच जात होते. बघता बघता 

दसऱ्याचा सण आला. पिंटूच्या बाबांनी त्याच्यासाठी भारीमधला ड्रेस आणला होता. त्यामुळे साहजिकच पिंटू खूप खूश होता. मग

नवीन ड्रेस घालून सायंकाळी तो बाबांच्या दुचाकीवरून बाबांच्या मित्रांकडे सोने वाटायला निघाला. थोडं पुढे गेल्यावर चौकात वाहतूक खोळंबली होती. तसंच रस्त्यावरही लोकांची गर्दी जमली होती.

 पिंटूच्या बाबांनी गाडी हळूहळू चालवत कसातरी रस्ता पार केला. पलीकडे गेल्यावर काही वेळाने सुरळीत वाहतूक सुरू असताना शेजारून एक पीएमटी बस गेली. बसच्या खिडकीत बसलेला पान खाणारा माणूस अचानक खिडकीतून बाहेर थुंकला. ती थुंकीची पिचकारी नेमकी पिंटूच्या अंगावर पडली आणि त्याच्या नव्याकोऱ्या कपड्यांची वाट लागली. पिंटू जोरात ओरडला. त्याच्या आवाजानं बाबा गडबडले आणि त्यांनी वेग कमी करत गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. तेव्हा कुठं काय घडलं हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी कपाळावर हात मारून घेतला! पिंटू तर रडायलाच लागला. दसरा साजरा करण्याचा त्याचा मूड गेला. 

     त्यानंतर बाबांनी गाडी घराकडे वळवली. दोघंही घरी पोहोचले, मात्र पिंटूचं रडणं थांबलं नव्हतं. त्याच्या आईनं त्याची समजूत घातली आणि त्याला कपडे बदलायला दिले. आता परत जाण्यात अर्थ नाही असा विचार करून पिंटूला जवळ घेऊन बाबा म्हणाले, “पिंटू, आता समजलं का सार्वजनिक स्वच्छतेचं महत्त्व? अरे, इतके दिवस आम्ही तुला सांगत तुला होतो. घराच्या खिडकीतून, दारातून रस्त्यावर किंवा इकडे तिकडे थुंकू नकोस! तुझ्या थुंकण्यामुळे किती लोकांना त्रास झाला, किती लोक घरी भांडायला आले ? ते कशासाठी आता समजलं ना! थुंकीमुळे आज तुझे कपडे घाण झाले तर तुला रडायला आलं. तुझा मूड खराब झाला. आपल्यामुळे दुसऱ्यांना देखील त्रास होऊ शकतो हे कळलं ना तुला आता!"

   बाबांचं बोलणं ऐकून पिंटूचे डोळे उघडले. त्यानं खाली मान घातली. त्याला खूप वाईट वाटलं. त्या दिवसापासून पिंटूनं निर्धार केला... वाटेल तिथं, सार्वजनिक ठिकाणी अजिबात थुंकायचं नाही म्हणजे नाहीच!

विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

मोबाईल 9923797725

No comments:

Post a Comment