मनातला एव्हरेस्ट…
मी एका सामान्य कुटुंबातली सामान्य मुलगी. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय... मनात खदखदत असलेलं सारं सारं बाहेर काढायचंय! तो दुर्दैवी दिवस मी कसा विसरेन? मी अरूणिमा सिन्हा, वय वर्षे २९. मध्यमवर्गीय कुटुंबातील तुमच्यासारखीच. १२ एप्रिल २०११ या दिवशी मी एका नोकरीच्या मुलाखतीसाठी जाणे आवश्यक असल्याने पद्मावती एक्सप्रेसने लखनऊ ते दिल्ली असा प्रवास करत होते. आरक्षण न मिळाल्याने रेल्वेच्या जनरल बोगीत बसले होते. संपूर्ण डबा प्रवाशांनी खचाखच भरला होता. सगळे लहान-मोठे, तळागाळातले लोक विनातक्रार प्रवासाचा अनुभव घेत होते आणि अचानक मध्यरात्रीच्या सुमारास लुटारू गुंडांची टोळी आमच्या डब्यात घुसली. बघताबघता त्यांनी हैदोस मांडला. कुणाचे दागिने तर कुणाचे पैसे, मौल्यवान वस्तू लुटण्यास त्यांनी सुरूवात केली. मग माझ्यावर पाळी आली. माझ्या गळ्यात सोनसाखळी असल्याने ती हिसकावून घेण्यास एकाने माझ्याशी बरीच झटापट केली. मी एक राष्ट्रीय पातळीची व्हॉलीबॉल चॅम्पियन असल्याने सहजासहजी हार मानणारी नव्हतेच. आत्मविश्वासाने त्या गुंडाला सामोरे जाण्याचे ठरवले. त्यावेळी मी तीव्र विरोध केला तेव्हा इतर गुंड त्याच्या मदतीला आले.
माझा प्रतिकार त्या गुंडांसमोर तोकडा पडला. त्यांनी जबरदस्तीने सोनसाखळी हिसकावून घेतली आणि मारहाण करून मला त्या चालत्या गाडीच्या डब्यातून त्यांनी बाहेर भिरकावून दिले. नेमक्या त्याचवेळी दुर्दैवाने विरूद्ध दिशेने दुसरी एक गाडी 'क्रॉस' होत असल्याने तिच्यावर जाऊन मी धडकलेच आणि दोन्ही चालत्या गाड्यांच्या मध्ये खाली आपटले गेले. गाड्या निघून गेल्यावर मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडू लागले... पण त्या काळोख्या भयाण रात्री तिथं कोण असणार? कोणीच आलं नाही… तब्बल सहा सात तास तशीच पडून होते… जीवघेण्या वेदनेनं विव्हळत! त्या कालावधीत जवळपास ४९ गाड्यांनी माझ्या आजूबाजूने ये-जा केली धाडधाड आवाज करत! काही वेळाने मग दिवस उजाडण्याची वेळ झाली. मी उठण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण पायात हालचालच नव्हती. बहुतेक पाय तुटला असावा! असह्य वेदना होत होत्या. एक जमेची बाजू म्हणजे डोक्याला काहीच मार लागला नसल्याने मेंदू जागेवरच होता म्हणजे ‘ब्रेन कॉन्शस’ कार्यरत होता. मी पूर्णपणे शुद्धीत होते पण रक्तस्रावामुळे ग्लानी आल्यासारखे वाटत होते. तरीही ओरडून हात हलवत उठण्यासाठी धडपड करत होते!
आता चांगलंच उजाडल्यामुळे जवळच्या गावातील लोकांचे लक्ष माझ्याकडे वेधले गेले. दोन तीन व्यक्तिंनी जवळ येऊन माझी केविलवाणी अवस्था बघितली अन् ताबडतोब हालचाल करत त्यांनी मला उचलले. मग गावातील एका खाटल्यावर निजवले. विचारपूस केली. प्यायला पाणी दिले. माझ्या क्षीण होत चाललेल्या आवाजात त्यांना सगळी 'आपबीती' सांगितली. मग त्यांनी मला जवळच्या बरेली जिल्हा दवाखान्यात त्वरित दाखल केलं. तेथील डॉक्टरांनी माझी अवस्था बघितली. त्यांचे बोलणे मला ऐकू येत होते. डॉक्टर्स आपापसात बोलत होते... आपल्याजवळ रक्त नाही, अॅनेस्थेशिया नाही मग उपचार कसे करणार? ते आपली असमर्थता दर्शवत होते. मी इकडे आत्यंतिक वेदनेने तडफडत होते त्यावेळी!
'जगण्याची धडपड माणसाला स्वस्थ बसू देत नाही!' हे वाक्य आठवलं अन् माझ्यात कुठून सामर्थ्य आलं कोणास ठाऊक…मी मोठ्याने ओरडले,
"डॉक्टर, माझा पाय तुटलेला आहे. कसंही, काहीही करून मला वाचवा प्लीज. मी रात्रभर रेल्वे ट्रॅकवर पडून होते. काहीतरी करा हो लवकर..."
तुम्हाला विश्वास बसणार नाही, तेथील डॉक्टर आणि फार्मासिस्ट, वॉर्ड बॉय इत्यादींनी स्वतः रक्तदान करून मला रक्त दिले आणि मग अॅनेस्थेशियाच्या शिवाय शस्त्रक्रिया करून माझा पाय कापण्यात आला. त्यावेळच्या त्या असह्य वेदना खरंच इतक्या जीवघेण्या होत्या... आता कुठल्या शब्दात सांगू तुम्हाला? आजही तो प्रसंग आठवला की, संपूर्ण शरीरभर वीज चमकल्यासारखी होते! माझी गोष्ट नंतर मीडियाला कळाली. अरूणिमा राष्ट्रीय खेळाडू आहे, हेही त्यांना कळले होते. मग मला किंग जॉर्ज मेडिकल हॉस्पिटल, लखनऊ येथे हलवण्यात आले. तिथं सविस्तर तपासणी करून त्यानंतर दिल्लीच्या प्रसिद्ध ‘एम्स’ हॉस्पिटलमध्ये मला दाखल करण्यात आले. तेथे माझ्यावर तब्बल चार महिने उपचार सुरू होते. सुरूवातीच्या जवळपास पंचवीस दिवसानंतर थोडं ठीक झाल्यावर, तेथील स्थानिक वर्तमानपत्रातील वर्णन वाचून तर मला धक्काच बसला. त्यात लिहिले होते…’अरूणिमाजवळ रेल्वे तिकिट नव्हते म्हणून तिने चालत्या गाडीतून उडी मारली!'
त्यावेळी माझ्या कुटुंबीयांनी मात्र त्या बातमीचे मीडियाजवळ जोरदार खंडन केले. काही वर्तमानपत्रात तर अरूणिमाने आत्महत्येसाठी उडी मारली असेही वर्णन होते. आता तुम्हीच सांगा, माझ्या कुटुंबीयांना काय वाटलं असणार हे सगळं वाचून? परिवारातील तरूण मुलीची ती अवस्था बघून, जिचा एक पाय कापण्यात आला, पुढं काय होणार याची अजिबात शाश्वती नाही… त्यांच्यावर त्यावेळी काय प्रसंग ओढवला असणार तुम्ही कल्पना करू शकता! आणि माझी अवस्था तर… मला त्यावेळी हसावं की रडावं हेच कळेना! तपासणीअंती माझ्या मणक्यात तीन ठिकाणी 'फॅक्चर्स' निघाले. मी कधीतरी उठू शकणार की नाही हेही मला माहीत नव्हतं! तरीही म्हणतात ना... 'जहाँ चाह होती है, वहाँ राह मिलही जाती है।'
माझ्या प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर काहीतरी वेगळं करून दाखवायचंच अशा प्रकारचे अनोखे विचार त्यावेळी त्या दवाखान्याच्या बेडवरच माझ्या मनात रुंजी घालत होते. आता आपला आवडता खेळ व्हॉलीबॉलला तर अलविदा करणे भागच होते कारण मला एक पाय नव्हता. कृत्रिम पाय जोडल्यानंतर पुढं काय करता येईल याचा विचार मी करू लागले अन् डोक्यात एक विलक्षण कल्पना सुचली... 'पंगू लंघुयते गिरीम्' आपण माऊंटेनिंग (गिर्यारोहण) करायचं... मनाशी निर्धार पक्का केला पण ते सहज शक्य नव्हतंच. एक तर अशा अवस्थेत मला प्रशिक्षण देणार कोण? आणि दुसरं असं की, प्रायोजकत्व कुठून मिळवायचं? तरीसुद्धा मी आपली अनोखी कल्पना सगळ्यांजवळ व्यक्त केली.. “मला गिर्यारोहण करायचंय, मला तो माऊंट एव्हरेस्ट सर करायचाय!'’
“काय? तुझं डोकं बिकं फिरलंय की काय? तू वेडी तर झाली नाहीस ना? अगं हे कसं शक्य आहे? तुझा एक पाय नकली आहे, दुसऱ्या पायात रॉड आहे. तुला साधं चालतानाच लंगडत चालावं लागतं अन् हे काय भलतंच खूळ तुझ्या डोक्यात शिरलंय!”
“अगं, अरूणिमा तू राष्ट्रीय खेळाडू आहेस, त्या बळावर तुझ्या नोकरीसाठी प्रयत्न करूया ना आपण…”
कुटुंबीयांचं आणि मित्र परिवाराचं बोलणं ऐकून मला वाटलं, लोक माझी 'फिजिकली कंडिशन' बघून आपापली मतं द्यायचे…'तू गिर्यारोहण करू शकणार नाहीस!’ मात्र माझा अंतरात्मा काय सांगतो, माझ्या आतला आवाज यांना कसा कळणार? माझा अंतरात्मा मला ओरडून सांगत होता... 'अरूणिमा तू हे नक्की करू शकतेस!' मला वाटते या जगात आपला सगळ्यात मोठा मोटिव्हेटर (समुपदेशक) आपणच असतो. जेव्हा आपला अंतरात्मा जागा होतो, आपण आपला आतला आवाज ऐकतो तेव्हा आपलं लक्ष्य प्राप्त करण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. एकदा का आपलं लक्ष्य प्राप्त करण्याचा निर्धार पक्का केला की मग तो तुम्ही पूर्णत्वास नेणारच हे निश्चित! माझे कुटुंबीय भक्कमपणे माझ्यासोबत होते. माझा भाऊ तर माझा मोठा आधार होता. तो मला म्हणाला,
“आपण बच्छेन्द्री पाल मॅडमकडे जाऊया. त्यांनी १९८४ मध्ये माऊंट एव्हरेस्ट सर केला होता…त्यांचा सल्ला घेऊन बघू. आपलं म्हणणं त्यांना पटवण्याचा प्रयत्न करूया. त्या नक्कीच काहीतरी चांगलं सांगणार... योग्य मार्गदर्शन करणार!”
मग आमचं ठरलं एकदाचं, बच्छेन्द्री मॅडमकडे जायचंच. काही दिवसातच मी आपल्या भावासह त्यांच्याकडं पोहोचले. त्यांची भेट घेतली आणि त्यांना काहीही न लपवता माझ्या बाबतीत घडलेलं सगळं खरं खरं सांगून मोकळी झाले. मग आपला दृढ निर्धार त्यांच्यासमोर व्यक्त केला... उत्तुंग गिर्यारोहणाचा, माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा! माझी मनापासून व्यक्त केलेली तळमळ ऐकून बच्छेंद्री पाल मॅडमच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या मला शांत करत म्हणाल्या…
"अरुणिमा तू एवढ्या मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत हा निर्धार केला आहेस म्हणजे तू आपल्या मनात नक्कीच एव्हरेस्ट सर केलाच आहेस! आता फक्त ते तुला आपल्या कृतीतून दाखवायचं आहे."
माझं कुटुंबीय सोडून बच्छेंद्री पाल मॅडम या पहिल्याच होत्या ज्यांनी माझ्या दृढ निर्धाराचं मनापासून समर्थन केलं. बाकी सगळ्यांचाच नन्नाचा पाढा होता. तुमच्यापैकी बहुतेकांना हा अनुभव आला असणारच... *आपण आपल्या मनातील काहीतरी वेगळं करू इच्छितो तेव्हा विरोध हा ठरलेलाच असतो.* असो! आता तर माझं पुढील नियोजन पक्क होतं अन् माऊंट एव्हरेस्ट सर केलेल्या बच्छेंद्री मॅडमही माझ्या पाठिशी भक्कमपणे उभ्या होत्या. इथपर्यंत तर सगळं ठीक होतं पण जेव्हा आपण ठरवलेल्या क्षेत्रात उतरतो तेव्हाच कळतं पाणी किती गहिरं आहे ते!
काही दिवसातच मी बच्छेंद्री मॅडमच्या बेस कॅम्पमध्ये दाखल झाले. त्यांनी खूप कौतुक केलं. माझा आत्मविश्वास जागवला आणि म्हणाल्या…
"अरूणिमा आता सिद्ध करायचंय तुला स्वतःला!”
त्याठिकाणी गिर्यारोहणाच्या वेळी सगळे प्रशिक्षणार्थी सामान्य होते. फक्त मीच एकटी वेगळी होते. एखाद्या 'पिक'वर गेलो की ते म्हणायचे... "अरूणिमा तू हळूहळू ये... स्वतःला जप बरं का!"
मग ते काही वेळातच वर टॉपवर पोहोचायचे अन् मला मात्र तीन-तीन तास लागायचे. कारण माझा डावा पाय नकली होता, उजव्या पायात रॉड होता. मणक्यात सुद्धा त्रास होताच पण मी जिद्द सोडली नाही! मग एकदा ठाम निश्चय करून संकल्प केला की एक दिवस असा नक्की येणार आणि मी सगळ्यांच्या आधी पोहोचणार अगदी टॉपवर! जवळपास आठ महिन्यानंतर... तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पूर्ण साहित्य सोबत घेऊन बेस कॅम्पमधून निघाल्यावर 'पिक'च्या टॉपवर मी सगळ्यांच्या आधी पोहोचले… त्यावेळी मी स्वतःवर जाम खूश होते. मात्र त्यापेक्षा जास्त आनंदी मी तेव्हा झाले, जेव्हा सगळे विचारायचे... “अरूणिमा तू नेमकं काय खातेस? इतकी ताकद कशी आली गं तुझ्यात? पाय नाही तरी चालतेस तरी कशी?"
त्यानंतर बऱ्याच प्रयत्नाअंती मला 'स्पॉन्सरशीप' मिळाली… माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी! तरीसुद्धा एक समस्या होतीच… माऊंट एव्हरेस्टजवळ गेल्यावर स्वतःबद्दल सगळं समजावून सांगण्याची. सोबत येणाऱ्या तेथील शेरपाला जेव्हा कळलं, माझा पाय नकली आहे तेव्हा तो लगेच म्हणाला,
"तुला घेऊन मी जाऊ शकणार नाही. तुझ्याबरोबर तर मला माझासुद्धा जीव गमवावा लागणार!"
मग बच्छेंद्री मॅडमनी त्याला सगळं व्यवस्थितपणे समजावून सांगितलं माझ्याबद्दल... माझ्या दृढ निर्धाराबद्दल! आणि हो, एक सांगायचंय मला आपण टीव्हीवर, चित्रपटात नेहमी बघतो निळ्याशार सुंदर टेकड्या, पर्वतरांगा वगैरे! प्रत्यक्षात मात्र तिथं गेल्यावर चित्र वेगळं असतं. ते बघून अंगावर काटा येतो. म्हणतात ना, ‘दुरून डोंगर साजरे’ अगदी तसंच!
आणि मग सुरू झाला एक चित्तथरारक प्रवास... माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी आम्ही एकूण सहाजण होतो. मोठ्या आनंदाने सुरूवात केली पण त्या भुसभुशीत बर्फात पाय ठेवायचे, तेव्हा माझा नकली पाय मुडपून जायचा आणि तोलही जायचा. त्यावेळी शेरपा ओरडायचा, "अरूणिमा तू आता परत जा, तुला जमणार नाही."
मग त्या शेरपावर एकदा मी मोठ्याने खेकसलेच…
"मी येणारच. हा माझा पाय आहे. त्यानं कसं चालायचं हे मला चांगलं ठाऊक आहे." माझ्या आवाजातील जरब आणि माझा आत्मविश्वास बघून शेरपा चांगलाच वरमला आणि तो मनोमन समजला असणार... हे वेगळंच रसायन आहे! मग मी जाणीवपूर्वक लक्ष देऊन चालायला लागले. हळूहळू मला अंदाज येऊ लागला... त्या बर्फातील खाचखळग्यांचा! आम्ही कॅम्प-३ पर्यंतची चढाई पूर्ण केली. आता माझा आत्मविश्वास दुणावला होता. मग साऊथ पोलपर्यंतचा जीवघेणा प्रवास अन् नंतरच एव्हरेस्ट सबमिशन... खरंच खूप 'हॉरर' होतं सगळं! कारण पुढं जाताना वाटेत काही ठिकाणी मरणासन्न अवस्थेत पडलेल्या व्यक्ती दिसायच्या. अशावेळी तर चांगल्या निर्ढावलेल्या गिर्यारोहकांचं सुद्धा मनोबल खच्ची होतं! मग आम्ही तर अगदी नवखे होतो... पहिलीच वेळ होती आमची. मनात एक विचार आला, ज्या उद्देशाने आपण माऊन्ट एव्हरेस्ट सर करण्यास पुढे सरकत आहोत त्यासाठी हे लोक इथं मृत्यूशी झूज देत आहेत! अशावेळी खरंच शरीरावर काटा उभा राहतो… ते म्हणतात ना, रोंगटे खडे हो जाते है! त्यावेळी मला खरंच अतिशय भीती वाटली… पंधरा मिनीटं तरी तशीच थांबले. अशावेळी निर्णय तुमच्या हातात असतो, तेव्हा अजिबात डगमगायचं नसतं!
आणि अचानक त्यावेळी बच्छेंद्री पाल मॅडमचे उत्साहाने भारलेले ते बोल आठवले…
"तुम्ही जर एक पाऊल पुढे टाकाल तर तुमची बाकीची पाऊले आपोआपच पुढे सरकणार!" मग मन खंबीर करून ठाम निर्धाराने पाऊल पुढे टाकले अन् ठरवले, कुणी पुढे गेलं नाही तरी मी जाणारच! 'सबमिशन' पूर्ण करून एव्हरेस्ट सर करणारच... सगळ्यांसाठी! एक लक्षात ठेवा जसा आपण विचार करतो ना, तसंच आपलं शरीर ते 'जनरेट' करणं सुरू करतं.
एकप्रकारची उर्मी येते त्यावेळी, मग तुम्हाला कुणी कुणीच रोखू शकत नाही! धाडसानं एक एक पाऊल पुढे पडत होते. आता मागे वळून बघायचं नव्हतंच, काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासानं आम्ही पुढं पुढं सरकत होतो. 'हिलेरी स्ट्रीप' जवळ पोहचताच शेरपा अचानक माझ्या हाताला हिसका देऊन ओरडला…
“अरुणिमा आता पुढं जाणं फार अवघड आहे, शिवाय तुझा प्राणवायूचा कोटाही आता फारच कमी आहे!"
त्यावेळी 'हिलेरी स्ट्रीप' नंतर पुढचा टप्पा म्हणजे एव्हरेस्ट सर करायचा होता. इतकं जवळ आल्यानंतर... आपल्या 'टार्गेट'च्या इतक्या जवळ आल्यावर कुणी तुम्हाला म्हणालं, 'आता परत जाऊया' तर कसं वाटणार? मी जवळजवळ खवळूनच शेरपाला बोलले...
"मी आता परत जाणार नाही. परतण्यासाठी इथंपर्यंतचा प्रवास केला नाही मी, कळलं का… मी पुढं जाणारच!"
शेरपा अत्यंत काकुळतीने म्हणाला…
“अरुणिमा, अगं जिन्दगी राहील तर परत तुला प्रयत्न करता येणारच ना... दुसऱ्या प्रयत्नातही एव्हरेस्ट सर करता येईल!"
जीवनात सुवर्णसंधी एकदाच येते, हे मला चांगलंच ठाऊक होतं. ती पुन्हा मिळणार नाही. आता ही संधी दवडून कसं चालणार? अन् मला एव्हरेस्टसाठी स्पॉन्सरशीप सुद्धा फार मुश्किलीने मिळाली होती, ती परत कधी मिळणार न मिळणार! मला बच्छेन्द्री मॅडम यांनी आणि माझ्या आईनेही सांगितलेलं त्यावेळी आठवलं...
"कधी कधी जीवनात असे काही बिकट प्रसंग येतात, तेव्हा निर्णय आपल्याला एकट्यालाच घ्यावे लागतात!"
अन् त्या विचाराने खरंच अंग रोमांचित झालं, अंगावर मूठभर मांस चढल्याचा साक्षात्कार झाला! मग शेरपाला समजावणीच्या सुरात म्हटलं… "भाई चल, आपल्याला गेलंच पाहिजे पुढं, आता थांबायचं नाहीच... एव्हरेस्ट सर करायचाच!"
मग लगेच मी पाऊल पुढं टाकलं, आम्ही चालतच होतो अन् जवळपास एक ते सव्वा तासाने मी एकदम 'टॉप'वर होते… हो मी एव्हरेस्ट सर केला होता! आनंद गगनात मावत नव्हता... त्यावेळी असं वाटलं, दोन्ही हात वर करून जोरजोरात ओरडून सगळ्यांना सांगावं...
"बघा आज मी एव्हरेस्ट सर केलंय... मी मुलगी असून, एका पायानं अधू असूनही इथपर्यंत आले अन् जगातलं सर्वात उंच ठिकाण माऊन्ट एव्हरेस्ट सर केलाय मी!"
सगळ्यांना मला हेच सांगायचंय, *एकदा विचार पक्का करुन ठरवलं की तुम्ही सर्व काही करू शकता. फक्त गरज आहे तुमच्या निर्धाराची, ठाम निश्चयाची! तुमच्या शरीराच्या कुठल्याही भागात अपंगत्व असूद्या पण सारासार विचार करणाऱ्या तुमच्या मेंदूमध्ये विचारांची अपंगता अजिबात यायला नको. जर का कुणाच्या मेंदूत विचारांची अपंगता असेल तर तो सामान्य धडधाकट माणूसही अपंगच आहे!*
८८४८ मीटरच्या उंचीवर एव्हरेस्ट सर केल्यावर त्या आनंदाच्या भरात मी शेरपाला म्हणाले…
"भाई! चल, माझा एक मस्तपैकी फोटो काढ. मी आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा हातात घेते.”
याठिकाणी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगते, तुम्ही बाहेर कुठंही गेल्यावरच आपल्या तिरंग्याचे मोल आपल्याला शतपटीने कळते!
मात्र त्यावेळी शेरपा मला उसळून म्हणाला,
"अरूणिमा तू वेडी आहेस का? आता तुझा प्राणवायू कधीही संपणार. चल, आवर लवकर. झटपट परत निघायचंय आपल्याला!”
मात्र माझ्या जिद्दीपुढे नतमस्तक होऊन त्याने माझा झकास फोटो घेतला. मग लगेच शेरपा माझ्यावर इतका रागावला ना, जेव्हा मी त्याला म्हटलं, "आता माझा व्हिडीओ तयार करायचाय!"
८८४८ मीटरच्या उंचीवर प्राणवायू संपत आलाय अन् मी त्या शेरपाला व्हिडीओसाठी गळ घालतेय. त्यावेळी तो माझ्यावर रागावून म्हणाला…
"नको, मी जातो आहे खाली आता. तू मर इथंच!"
त्यावेळी मला कुठंतरी माझ्या अंतर्मनात जाणवलं, परत जाताना आपण जिवंत खाली पोहोचलो नाही तर हा व्हिडीओ तरी आपल्या घरचे बघतील आणि म्हणतील… "आपल्या बहाद्दर मुलीनं एव्हरेस्ट सर केलाय. ती डगमगली नाही. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तिनं माघार घेतली नाही!"
हा विचार मनात येताच शेरपाला मी खूप समजावलं,
"उगीच वेळ घालवू नकोस बाबा. अरे, मी वाचले नाही तर निदान हा व्हिडीओ तरी तू तिकडे पोहचता करशील ना?"
शेवटी नाईलाजाने शेरपा तयार झाला. त्याने माझा तिरंगा फडकावित असलेला व्हिडीओ शूट केला. दिनांक २१ मे २०१३ रोजी १०.५५ वाजता मी ८८४८ मीटर उंचीवर, जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर होते. त्याठिकाणी तेव्हाचे तापमान उणे ६० डिग्री सेंटीग्रेड होते. मग लवकरात लवकर खाली उतरणे अतिशय आवश्यक असल्याने लागलीच उतरायला सुरूवात केली. शेरपा सोबत होताच पण...
…पण हाय! थोडं अंतर पार केल्यावर दुर्दैवानं माझा प्राणवायूचा पुरवठा संपत आल्याचं जाणवलं. मी अचानक जागच्या जागीच कोसळलेच! एव्हरेस्ट सर करणारे जास्तीत जास्त गिर्यारोहक परतीच्या प्रवासात, खाली उतरताना आपला प्राण गमावतात हे मी ऐकून होते. शेरपा जवळ येऊन मला हिंमत देत म्हणाला…
"अरूणिमा मला भरवसा नव्हता की तू एवढा उंच एव्हरेस्ट सर करणार! पण तू आपली जिद्द पूर्ण केलीच. आता मला असं वाटतं, तू जिवंत खाली पोहचायलाच हवं. हे बघ, अशी हिंमत हारू नकोस. चल ऊठ, तुला चालायलाच पाहिजे."
शेरपा मला हात धरून उठवायचा प्रयत्न करू लागला पण माझ्या शरीरात त्राणच नव्हतं. मला उठणंच अशक्य झालं तर चालायची बात तर दूरच! पण म्हणतात ना... आपल्या दुनियेचे जसे नियम आहेत, तसेच त्या परमेश्वराच्या दुनियेचेही काही नियम असणारच. त्याच्या यादीत त्यावेळी कदाचित माझं नाव नव्हतंच. माझी घटका भरायची होती! मला त्यावेळी प्रकर्षानं आठवलं... जेव्हा मी रेल्वे ट्रॅकवर पाय तुटलेल्या अवस्थेत तब्बल सहा-सात तास पडून होते, मला अगदी खेटून एक-दोन नव्हे तर तब्बल ४९ गाड्यांनी धडधडत ये - जा केली तेव्हाच मला असं वाटलं होतं… त्या दयाळू परमेश्वराने आपल्याला काहीतरी अचाट कार्य करण्यासाठीच जिवंत ठेवलेलं आहे… काहीतरी नवा इतिहास रचण्यासाठी!
नेमकं त्याचवेळेस एक ब्रिटीश गिर्यारोहक उतरताना दिसला. त्याच्याजवळ दोन प्राणवायूचे नळकांडे उपलब्ध होते… त्याने आपलं ओझं कमी करण्यासाठी एक नळकांडे तेथेच सोडून तो खाली उतरू लागला होता. ते पाहताच मग वेळ न दवडता शेरपा लगेच ते नळकांडे घेऊन माझ्याकडे येत म्हणाला…
"बघ अरूणिमा, तू खरंच खूप भाग्यवान आहेस. अगं एवढ्या उंचीवर प्राणवायू मिळणे म्हणजे अगदी स्वप्नवत असते. हे नळकांडे तुझ्यासाठी जणू त्या देवानेच पाठवले आहे."
आकाशाकडे दोन्ही हात उंचावत असलेल्या त्या शेरपाने त्वरित ते प्राणवायूचे नळकांडे मला लावून दिले आणि एक कडक सॅल्यूट ठोकला. मग माझ्या जिवात जीव आला. त्या दयाळू परमेश्वराचे मनापासून आभार मानले! त्या क्षणी जणू मला आकाशवाणी ऐकल्याचा साक्षात्कार झाला... 'भाग्यसुद्धा त्यालाच साथ देते, ज्याला जिंकायचं वेड असते!’
मग मी तत्परतेनं उठून शेरपासोबत अधिक जोमाने खाली उतरायला लागले. आता हवामान झपाट्याने बदलत होते अन् त्या उत्साहाच्या भरात चालताना अचानक माझा नकली पाय निखळला! मी पडता पडता सावरले. आता तापमान उणे साठपेक्षाही कमी झाल्याचं शेरपा सांगत होता. माझे दोन्ही हात गारठून बधीर झाले. तळहाताची हालचालही होत नव्हती. बोटामधून रक्त यायला लागलं. शेरपाला ते मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तो त्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला...
"आपण आता लवकरात लवकर खाली गेलेलं बरं, खालचं तापमान जरा जास्त असणार."
त्यावेळी वेदनेमुळे प्रयत्न करूनही मी आपले अश्रू आवरू शकले नाही पण आता रडून उपयोग नव्हता. एका हाताने तो नकली पाय सरपटत व दुसरा हात 'रोप'ला धरून मी उतरायला लागले. तेव्हा दुसरा काही इलाजच नव्हता. असह्य वेदना सोबतीला होत्याच! काही वेळानंतर सपाट जागा बघून निखळलेला नकली पाय व्यवस्थित बसवण्यात मी यशस्वी झाले आणि सावकाश चालू लागले!
ही थरारक मोहीम पूर्ण करायला सामान्य गिर्यारोहकाला सतरा ते अठरा तास लागतात. मला मात्र त्यावेळी एकूण २८ तास लागले. खाली सुखरूप पोहचल्यानंतर मला बघून सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटलं. त्यांच्यापैकी कोणीतरी म्हणालेही…
"आम्हाला वाटलं अरूणिमा आता काही परत येणार नाही!"
सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदमिश्रीत भाव होते. मला आता एकच सांगावंसं वाटतं ...
"सगळं काही आपल्या आतच असतं. जे करायचं आहे त्यासाठी आपल्या मनाचा निर्धार पक्का करायला हवा. माझी आता महत्त्वाकांक्षा आहे, जगातील सर्वच उंच ठिकाणं सर करण्याची. एक जिद्द आहे, एक जुनून आहे... उंच उंच भरारी घेण्याची!"
“अभी तो इस बाजकी असली उडान बाकी है
अभी तो इस परिंदे का इम्तहान बाकी है!
अभी अभी लांघा है समुंदरोंको मैने...
अभी तो पुरा आसमान बाकी है!!”
… विनोद श्रा. पंचभाई
9923797725
No comments:
Post a Comment