Sunday, February 22, 2026

विवेकानंद घडताना

 विवेकानंद घडताना


       “इतर अनेक धर्मांना एखादा ठराविक संस्थापक असतो मात्र हिंदू धर्मासाठी कोणतीही एक व्यक्ती मूळ मानली जात नाही. हा धर्म अनेक ऋषिमुनींच्या शतकानुशतकांच्या चिंतनातून, तपश्चर्येतून आणि अनुभूतीतून प्रकट झालेला आहे. म्हणूनच तो कोणाचाही व्यक्तिगत धर्म नसून सार्वत्रिक आणि शाश्वत सत्यावर आधारित धर्म आहे!” हे अत्यंत प्रभावी विचार आहेत युगपुरुष स्वामी विवेकानंद यांचे! 

 “माझ्या भगिनींनो आणि बंधुनो!” अशी आपल्या भाषणाची अनोखी सुरुवात करणाऱ्या स्वामींजींनी १८९३ साली शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेत वरीलप्रमाणे अभ्यासपूर्ण विचार मांडले होते. त्यानंतर मग जगभर स्वामीजींचं नाव त्यांच्या प्रेरणादायी वक्तृत्वाने आणि कर्तृत्वाने गाजत राहिलं, हे आपण सगळे जाणतोच.

        प्रिय लेखकमित्र जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेलं ‘विवेकानंद घडताना’ हे चरित्रात्मक पुस्तक आज बारकाईने वाचायला हाती घेतलं. खरंतर यापूर्वी देखील हे पुस्तक अधूनमधून थोडं वाचण्यात आलं होतं. त्याचवेळी वाटलं, स्वामीजींचा अगदी बालपणापासून उल्लेख असलेलं ‘विवेकानंद घडताना’ निवांतपणे सविस्तर वाचायलाच हवं. 

        आपल्या मनोगतातून लेखक जयंत कुलकर्णी यांनी… “जात, धर्म, भाषा, पंथ, प्रांत, उच्च-नीच यामध्ये भांडत बसून, विभागून आपण अधिक दुर्बल होत आहोत, आपण स्वतःचे नुकसान करून घेत आहोत हे स्वामींजींनी सांगितलेले सत्य त्यावेळीही उपयोगी होते आणि आजही आहे.” अशाप्रकारे अत्यंत मार्मिक निवेदन केले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकांनी ‘विवेकानंदांचे बालपण’ या पहिल्या प्रकरणापासून ते ‘धर्म प्रवर्तनाची सांगता’ या शेवटच्या प्रकरणापर्यंत स्वामीजींचा सविस्तर जीवनपट उलगडला आहे. हे सविस्तर चरित्र वाचताना त्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली… हे प्रेरणादायी पुस्तक लिहिताना त्यांनी उगाच बोजड किंवा अलंकारिक शब्दांचा आधार न घेता सहज सोपी भाषा वापरली असल्यामुळे वाचताना कुठंही कंटाळवाणं वाटत नाही! उलट स्वामी विवेकानंद यांच्या उत्तुंग विचारांनी अगदी भारावल्यासारखं वाटतं आणि आपल्याला पानांगणिक बऱ्यापैकी आगळीवेगळी अशी ज्ञानप्राप्तीही होते… आणि हेच या साहित्यकृतीचं यश आहे असं याठिकाणी नमूद केल्याशिवाय राहवत नाही! 

      स्वामीजींचा जन्म, त्यांचं बालपण, वडील विश्वनाथ आणि माता भुवनेश्वरीदेवी यांच्या छत्रछायेखालील त्यांची जडणघडण, स्वामीजींना आलेले स्तिमित करणारे अनेक अनुभव लेखक कुलकर्णी यांनी ‘विवेकानंद घडताना’ या साहित्यकृतीत मोठ्या खुबीने मांडले आहेत. त्याचप्रमाणे श्रीरामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या गु्रू शिष्यांची अनोखी भेट वाचताना भान हरपून जाते… त्यावेळी या प्रकरणातील प्रभावी संवाद आपल्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही! एका भावस्पर्शी प्रसंगात श्रीरामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांना विचारतात…

“मी गेल्या कित्येक दिवसापासून तुझ्याशी एक शब्दही बोललेलो नाही, तरी तू माझ्याकडे का येतोस?” 

त्यावर स्वामीजी हसून उत्तर देतात…

“गुरुदेव, मी दक्षिणेश्वरला तुमच्याकडे येतो कारण माझे तुमच्यावर प्रेम आहे. मला तुम्हाला पाहावेसे वाटते, बोलावेसे नव्हे. तुम्ही मला काही सांगाल, म्हणून मी येत नाही!”

हे ऐकून श्रीरामकृष्णाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात आणि ते म्हणतात…

“नरेंद्र, मी तुझी परीक्षा घेत होतो. मी तुला जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले, पाहावेसे वाटले की या बाह्य थंडपणाने तुझे प्रेम कमी होते का… पण तू माझ्यावरचा विश्वास आणि प्रेम कायम ठेवलेस. म्हणूनच तू माझा खरा शिष्य आहेस!” 

 त्याक्षणी विश्वास, निष्ठा आणि प्रेमाने बांधलेले ते गु्रू शिष्याचे नाते अखंड झाले होते. आज आपण सर्वत्र बघतो, लाखो रुपये मानधन घेऊन प्रवचन करणारे आजचे मतलबी गु्रू आपल्या शिष्यांकडून अजूनही काही मिळते का… याचीच अपेक्षा बाळगतात!

      ‘विवेकानंद घडताना’ या चरित्र ग्रंथाच्या माध्यमातून लेखक जयंत कुलकर्णी यांनी आजची नवीन पिढी कशी घडवायला हवी याचा जणू परिपाठच मांडला आहे. त्यामुळे पालकांनी ‘विवेकानंद घडताना’ आधी स्वतः मुळातून वाचायला हवं आणि त्यानंतर आपल्या मुलांना ते वाचण्यासाठी आग्रह करायला हवा… जेणेकरून त्यांच्यावर उत्तम संस्कार होतील! खरंतर आजच्या भरकटत चाललेल्या परिस्थितीत अशाच उत्तम चरित्र ग्रंथांची समाजाला नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी, या अप्रतिम साहित्यकृतीच्या निर्मितीसाठी लेखक महोदय यांचं मनापासून अभिनंदन!

       गुणग्राहकता लाभलेले पुण्यातील हरहुन्नरी प्रकाशक शैलेंद्र कदम यांनी ‘विवेकानंद घडताना’ हा चरित्र ग्रंथ प्रकाशित केला आहे. तसेच साजेसे मुखपृष्ठ चित्रकार प्रशांत भारताल यांनी तयार केलंय. प्रत्येक घरात संग्रही असायला हवं असं हे प्रेरणादायी पुस्तक ‘विवेकानंद घडताना’ रसिक वाचकांनी आवर्जून खरेदी करून इतरांनाही भेट द्यायला हवं, जेणेकरून ते येणाऱ्या पिढीसाठी ते निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल.

       लेखक जयंत कुलकर्णी यांना त्यांच्या देदीप्यमान साहित्यिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!


पुस्तकाचे नाव :  विवेकानंद घडताना 

लेखक : जयंत शंकर कुलकर्णी 

एकूण पाने... २२४

किंमत.... २८० रुपये 

प्रकाशक... शैलेंद्र कदम, दुर्वा एजन्सीज् पुणे                 

परिचयकर्ता... विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

संपर्क : 9923797725, 9423534156

No comments:

Post a Comment