अति उच्चतम जीवन बने...
संस्कृत भाषेत एक श्लोक आहे ज्याचा अर्थ असा आहे, "जो सकाळी उठून नियमितपणे पाणी पितो, रात्री जेवण झाल्यावर दूध पितो व दुपारी जेवणानंतर ताक पितो त्याला वैद्याची गरज पडत नाही."अर्थात शरीर निरोगी राहण्याची ही गुरुकिल्ली होय. शरीर निरोगी असेल तर मन निरोगी राखण्यास मदत होणार यात शंका नाही. मन निरोगी, निर्मळ झाल्यास मग स्वतःसह इतरांचेही भले कसे करता येईल अशा प्रकारचे उदात्त विचार मनात आपसूकच येतील.
पण... पण जो माणूस सकाळी उठल्या उठल्याच दारूचा ग्लास हाती घेतो, त्याची मग पापांची मालिकाच जन्मभर सुरू असते, हे वेगळे सांगायला नको. आज आपण बघतो समाजात विकृती वाढत आहे. नको ती व्यसने लोक सहज गंमत म्हणून अंगीकारत आहेत. मात्र नंतर त्याची किंमत मोजताना अख्ख्या आयुष्याची कमाईसुध्दा पुरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे "व्यसने सगळी सोडुनि द्याना । सरळपणाचे जीवन जगा ना ।।" ह्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आर्त हाकेला आपण सगळ्यांनी 'ओ' देवून आपले जीवन उच्चतम बनवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी महाराजांनी सांगितलेली सामुदायिक प्रार्थना तसेच सामुदायिक ध्यान करणे ही आजच्या घडीला एक नवसंजीवनी ठरणार यात वाद नाही.
प्रातःसमयी उठून, स्नान करून, शुचिर्भूत झाल्यावर "आवो सभी मिल जायके, प्रभू ध्यान धरेंगे। 'सबका भला करो' यही आवाज करेंगे ।।" हे राष्ट्रसंतांचे संकल्पगीत म्हणून आपण दिवसाची सुरूवात करू शकतो. तसेच "हे सर्वधर्म मे सर्व संत मे, समस्त संसारमे रममाण होनेवाले चैतन्यधन । हम तेरे लिये, तेरे देश के लिये, हर जीवजंतू के लिये कुटिलताका, छलछिद्रद्रोहता का त्याग करे ऐसा साहस दे।"
"हे जगदव्यापी परमेश्वर । हम हर मनुष्यमात्रसे प्रेमका, सत्यता का, बंधुत्वभावका आचरण करे और सुखः दुखमे सम रहे ऐसी हमको शक्ती दे, युक्ति दे और भक्ती दे ।" याप्रमाणे ध्यान करून आपल्या मनाला योग्य वळण लावू शकतो. त्यामुळे मनात येणारे विकारी विचार दूर पळवू शकतो. पर्यायाने आपले व आपल्या सहवासातील सगळ्यांचे जीवन सुंदरतेने सजवू शकतो.
त्याचप्रमाणे राष्ट्रसंतांनी सांगितलेली सामुदायिक प्रार्थना नित्यनेमाने संध्याकाळी करून आपण एक आदर्श जीवन जगू शकतो. "है प्रार्थना गुरुदेवसे, यह स्वर्गसम संसार हो । अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो ।।" यापासून सुरू होणारे प्रार्थनाष्टक म्हणून त्याप्रमाणे आचरण केल्यास जगाच्या पाठीवरील कुठल्याही तीर्थक्षेत्री जाण्याची गरज कुणाला भासणार नाही. सारे जीवनच कर्ममय बनून दुसऱ्यांसाठी, दीन-दुबळ्यांसाठी आपण काहीतरी करावे ही भावना मनात उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ३० एप्रिल हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म दिनांक. परंतु महाराजांनी 'तो' दिवस ग्रामजयंती दिवस म्हणून साजरा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली होती. 'गावागावाशी जागवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा' अशी राष्ट्रसंतांनी ललकारी देऊन ग्रामाचा विकास हाच राष्ट्राचा विकास ही दूरदृष्टी समाजाला दिली. गावातला बळीराजा हाच खरा देशाचा पालनकर्ता असे संबोधून 'ग्रामगीता' हा विलक्षण ग्रंथ रचून त्यास समर्पित केला. मात्र त्यांनी 'ग्रामगीता नव्हे पारायणासि' असा इशाराही दिलेला आहे. नुसती फुले वाहून ग्रामगीतेचे पारायण करू नका तर त्यात सुचविल्यानुसार त्याप्रमाणे आचरण केल्यास तुमचे जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही समस्त समाजाला महाराजांनी अत्यंत आत्मियतेने दिली आहे.
मित्रहो, आजच्या वातावरणात आपल्याला आपले जीवन गर्तेत लोटायचे आहे की जीवन उच्चतम बनवायचे आहे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. परमेश्वराने प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहेच. ती सुबुद्धी समजून आपण आपले आचरण उच्चतम ठेवून जीवन जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया !
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना ग्रामजयंती दिनानिमित्त मनापासून आदरांजली वाहूया. जयगुरू !
... विनोद श्रा. पंचभाई
9923797725
No comments:
Post a Comment