आम्ही मराठी...
आम्ही मराठी आहोत, मराठी असण्याचा आम्हाला अभिमान आहे. बदल हा सृष्टीचा नियम आहे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. आम्ही घरातल्या जुन्या झालेल्या वस्तू बदलू, इंग्रजीत असलेल्या दुकानाच्या पाट्या मराठीत बदलण्यासाठी आग्रह धरू, या गावातून त्या गावात एकदा काय दहावेळा घरही बदलू पण आम्ही आमची वृत्ती बदलणार नाही! जुन्या बुरसटलेल्या परंपरा, चालीरिती आम्ही बदलणार नाही. त्या चुकीच्या असल्या तरी त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. एवढंच काय 'विचार बदलला तर तुम्ही बदलणार' हे तर आम्हाला मुळीच मान्य नाही.
इतरांची बदललेली परिस्थिती पण आम्हाला अजिबात खपत नाही. आमच्याच बांधवांची झालेली प्रगती आम्हाला डोळ्यात खुपते! स्वतःच्या पायावर उभं राहण्याची औकात नसताना आपल्याच माणसांचे पाय ओढण्यात आम्ही धन्यता मानतो. स्वतःच्या किरकोळ स्वार्थासाठी आम्ही परकीयांना आनंदाने मदत करतो. इतरांचे कौतुक सोहळे साजरे करू पण आपल्याच माणसांना मात्र एका शब्दानेही शाबासकी देणार नाही कारण आमची कोती वृत्ती, परंपरागत मानसिकता आड येते, आमचा 'इगो' दुखावला जातो ना!
कुणातरी थोर तत्त्ववेत्त्याने म्हटले आहे, 'तुम्ही एक पाऊल पुढे टाका, आपोआपच तुमचे दुसरे पाऊल पुढे सरकेल, मग तुमच्या मंझिलपर्यंत तुम्ही आरामात पोहचू शकाल.' पण आम्ही नवीन व्यवसाय सुरू करायचा म्हणा किंवा इतर नवीन कुठलाही उपक्रम म्हणा, आपले पाऊल पुढे टाकण्यास आम्ही धजावतच नाही किंवा कुणी तसे धाडस केले तर त्याला प्रोत्साहित करत नाही. उलट दुसऱ्यांचे पाऊल मागे कसे खेचता येईल हाच विचार करत बसतो. ही आपल्या मराठी माणसाची कुपमंडूक वृत्तीच आपल्याला पदोपदी मारक ठरत आहे! तरीही आम्ही ही मानसिकता बदलत नाही किंवा तसा प्रयत्नही करत नाही हे आम्हा मराठी माणसांचं मोठे दुर्दैवच म्हणावं लागेल!
अगदी आपले आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वकियांनीच जास्त विरोध केल्याचे आपण इतिहासात बघतो. स्वराज्य उभारणीच्या वेळी कित्येक मराठा सरदारांनीच स्वत:च्या किरकोळ स्वार्थासाठी वेळोवेळी अडथळे आणले. निरनिराळ्या अडचणी निर्माण केल्या पण त्या अफाट झंझावातासमोर पत्त्याच्या बंगल्यागत सारेच नेस्तनाबूत झाले. तशाप्रकारचा विलक्षण झंझावात आता येथे होणे नाही! महाराजांचे इतके मोठे जबरदस्त उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर असूनही आम्ही मराठी बांधव आपली वृत्ती, मानसिकता का बदलू शकत नाही?
बालपणी सोबत खेळलेला, बरोबरीनं शिकलेला आपला जिवलग मित्र अथवा आपला अगदी जवळचा नातलग, कालांतराने 'मोठ्ठा साहेब' झाल्यावर आपल्याशी तुटकपणे वागत असतो, संबंध ठेवायला तयार नसतो. साधी विचारपूस तर सोडाच, कधी कुठेतरी मोठ्या कार्यक्रमात अपघाताने भेटला तरी आपला चेहरा लपवतो. (कारण तेथे उपस्थित असलेल्या मोठ्या लोकात त्याच्या 'स्टेटस'चा प्रश्न असतो ना!) इतका जिवाभावाचा मराठी बांधव का असा वागतो? परिवर्तन हाच जगाचा नियम आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे! पिढ्या न पिढ्या गर्भश्रीमंत असणारेही कधीतरी दोन वेळच्या साध्या जेवणालाही मोताद होताना आपल्या बघण्यात येते. एखादा भयंकर भूकंप किंवा अक्राळविक्राळ त्सुनामी एका क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकते! म्हणजेच कुणाचीच परिस्थिती सदासर्वकाळ एकसारखीच असणार हे गृहीत धरता येत नाही. अशा या कधीही बदलणाऱ्या
परिस्थितीचं भान माणसानं ठेवायलाच हवं... विशेषतः आम्ही मराठी माणसांनी तरी ! कारण आपण नेहमी बघतो इतर समाजातील, उदाहरणादाखल सिंधी किंवा गुजराती बांधव बघा, कितीही हलाखीची परिस्थिती त्यांच्यातील कुणावरही आली तरी ते एकमेकांना तत्परतेने मदतीचा हात देतात. ते तुम्हाला कोणापुढे हात पसरताना आढळणार नाहीत. अन् आपला मराठी बांधव बघा... खोट्या प्रतिष्ठेपायी आपल्याच बांधवांविरूद्ध कोर्टकचेरीच्या इतक्या चकरा मारतो की, मग पार कर्जबाजारी होऊन भिकेला लागलो तरी ते आपल्याला चालतं! अशावेळी आपण केवळ वकिलाचं पोट भरायला मदत करत असतो हे आपल्या लक्षातच येत नाही.
आम्हा मराठी माणसांचा एक मोठ्ठा 'प्रॉब्लेम' म्हणजे कमालीचा संकुचितपणा! मी तेली-तू माळी, मी विणकर-तू धनगर, मी कासार-तू चांभार, मी मराठा-तू ब्राह्मण असा भेदाभेद आजही झपाट्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या जगात सर्वत्र आढळतो. आमचे आपआपसातील हेवेदावे आपल्याच भरभराटीला बाधक ठरणार हा साधा विचारही आपल्या मनात कधी येत नसतो. मग 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' म्हणण्याची लाजिरवाणी वेळ आपल्यावर येऊन ठेपते! आणि हो, आपलं दुर्दैव असं की एवढा भीमपराक्रम गाजवलेले असामान्य कर्तृत्व करून अजरामर झालेले आपले थोर पुरुषसुद्धा (लोकमान्य टिळक, महात्मा फुले, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर) आपण मराठी माणसांनीच आपल्या संकुचित व कोत्या वृत्तीने विभागून टाकलेले हल्ली दिसून येते! किती ही लाचारी...!
आपल्या आजच्या दुरवस्थेला खरंतर आपणच मराठी लोक जबाबदार आहोत. 'मराठी वाचवा, मराठी वाचवा' असा शंख करणाऱ्यांनी, मराठी माणूस कशाप्रकारे व्यापक दृष्टिकोन असलेला होईल यावर विचार करणे आवश्यक आहे. मराठी माणूस सर्वसमावेशक विचारसरणीचा, मोठ्या मनाचा व दिलदार वृत्तीचा कसा होईल ? विशाल आणि अखंड असा आपला महाराष्ट्र आहे, तेवढ्याच विशाल मनाचे आपण मराठी बांधव आहोत. 'एक ना एक दिवस आपण एक होऊन आपली ओळख जगात कायम करूया' असा संकल्प व निर्धार व्यक्त करण्यास कुणाचेच दुमत नसावे!
जय महाराष्ट्र!
... विनोद श्रा. पंचभाई
9923797725
No comments:
Post a Comment