Tuesday, April 16, 2024

उमाजीराजे... मनोगत

 

उमाजीराजे... मनोगत


      शूर, पराक्रमी राजे - महाराजे यांची महान परंपरा लाभलेला आपला देश कालांतराने, ब्रिटिशांच्या आगमनानंतर त्यांच्या जुलमी सत्तेच्या गुलामगिरीत जखडला गेला. त्या काळात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक महापुरुषांनी निकराचे प्रयत्न केले. कित्येक लढे उभारले गेले. चळवळी झाल्या, सत्याग्रह झाले. जुलमी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात देशभर जनसागर पेटून उठला. त्यांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी आपल्या असंख्य देशबांधवांनी स्वतःच्या जिवाची बाजी लावली... प्रसंगी कित्येकांनी प्राणांची आहुती दिली! सशस्त्र क्रांतीची ठिणगी भडकली आणि आपल्या जिवावर उदार होऊन स्वातंत्र्यासाठी लढणारे नीडर क्रांतिकारक उदयास येऊ लागले. क्रांतिकारक हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर नावे येतात ती हसत हसत फाशीचा दोर आपल्या गळ्यात अडकवणारे महान क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची!

      क्रांतिकारकांची ही महान परंपरा पूर्वापार म्हणजे अगदी 1857 च्या स्वातंत्र्याच्या सशस्त्र उठावापूर्वीपासून चालत आली होती. त्याकाळी प्रामुख्याने महाराजा यशवंतराव होळकर यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात सशस्त्र क्रांतिलढा उभारला होता. ते ब्रिटिशांविरुद्ध तब्बल अठरा युद्धात अपराजित राहिले आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला... सलग एकही लढाई न हरणारा एकमेव महाराजा अशी त्यांनी ख्याती मिळवली होती. त्यानंतर उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिलढ्याचे जणू शिरोमणी ठरले. भारताच्या इतिहासात अनेक रक्तरंजित ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. त्यातल्या काहींची नोंद झाली तर काही घटनांची दखलच घेण्यात आली नाही. उमाजी नाईक यांनी छत्रपती शिवरायांच्या देदिप्यमान कारकिर्दीचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते! त्यासाठी त्यांनी आपल्या रामोशी साथीदारांसोबत सशस्त्र क्रांतिलढा उभारून ब्रिटिशांना यशस्वीपणे टक्कर दिली आणि जवळजवळ चौदा वर्षे त्यांच्या नाकी नऊ आणले!

             दिनांक ३ फेब्रुवारी हा उमाजीराजे या आद्यक्रांतिवीराचा स्मृतिदिन... मात्र दुर्दैवाने हा स्मृतिदिन रामोशी बेरड समाजाशिवाय नेहमीप्रमाणे इतर कोणाच्याच लक्षात राहत नाही, हा केवढा दैवदुर्विलास! क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जातिधर्माच्या लोकांनी केले पाहिजे, याबाबत कुणाचेच दुमत नसावे... मग आद्यक्रांतिवीर असलेले उमाजी नाईक अशाप्रकारे उपेक्षित का राहून गेले हे खरोखरच आश्चर्य वाटण्यासारखे आहे! "मरावे परि क्रांतिरूपे उरावे" ही समर्पक उक्ती सशस्त्र क्रांतिलढ्याचे महानायक ठरलेले उमाजी नाईक यांच्याबाबत अगदी तंतोतंत जुळते. ब्रिटिशांच्या विरोधात लढताना ते स्वतःच्या अ‌द्भुत क्रांतिकार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत. त्यांचा गौरव करण्यापासून, त्यांचे कट्टर शत्रू असलेले इंग्रज अधिकारीही स्वतःला रोखू शकले नाहीत.

             ''क्रांतिलढ्याचे महानायक उमाजीराजे नाईक'' ही कादंबरी लिहिण्याची जबाबदारी पुण्यातील अग्रगण्य प्रकाशन संस्था असलेल्या 'प्राजक्त प्रकाशन'चे तडफदार प्रकाशक जालिंदर चांदगुडे यांनी माझ्यावर सोपवली. त्यांनी या कादंबरीला लागणाऱ्या महत्वाच्या संदर्भासाठी ज्येष्ठ साहित्यिक सदाशिव आठवले यांचा ग्रंथ 'उमाजी राजे, मुक्काम डोंगर' आणि डॉ. आ. ह. साळुंखे यांचे 'प्राईड ऑफ स्वराज उमाजीराजे नाईक' हे पुस्तक महत्प्रयासाने उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक संजय सोनवणी सर यांनी देखील काही अत्यंत महत्वपूर्ण संदर्भ पुरविल्याने ही कादंबरी पूर्णत्वास यायला मोलाची मदत झाली असे मी येथे नम्रपणे नमूद करतो. तसेच सोनवणी सरांनी ''क्रांतिलढ्याचे महानायक उमाजीराजे नाईक'' या कादंबरीसाठी त्यांच्या प्रभावी शैलीत प्रस्तावना लिहिली, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानतो! तसेच या कादंबरीसाठी आकर्षक मुखपृष्ठ रेखाटणारे चित्रकार यांचेही खूप धन्यवाद!


... विनोद श्रा. पंचभाई, पुणे  


No comments:

Post a Comment