समय तू धीरे धीरे चल !
काही काही क्षण आपल्या आयुष्यात असे येत असतात, इतके आनंददायी असतात की वाटतं... हे क्षण आपल्यासाठी असेच थांबावेत, ही वेळ कधीच पुढे सरकू नये! खूप दिवसांनंतर येणारे असे हे आनंददायी क्षण अवर्णनीय असतात... जसे घरात होणारे नव्या बाळाचे आगमन, अथक परिश्रमानंतर मिळणारे परिक्षेतील उत्तुंग यश, मनासारखी मिळालेली नोकरी, खूप दिवसानी भेटणारा दुरावलेला आपला प्रिय मित्र, भल्या सकाळी दिसणाऱ्या सूर्योदयाचा मनोहारी लालिमा.. इत्यादी इत्यादी..!
बोर्डाची परीक्षा सुरु असल्याने निखिलला टेन्शन होतेच. मराठीचा पहिलाच पेपर सोडवून त्याने घरात पाय ठेवला अन् ताईचा आवाज कानी पडला.. "काय म्हणतोय आजचा पेपर ? मनासारखा सोडवलास ना?"
"अगं पेपर तसा सोप्पाच होता, मला सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत असूनही वेळच पुरला नाही गं! इतक्या स्पीडने लिहूनही पुरेसा वेळ नव्हता, थोडा तरी वेळ मिळाला असता ना, तर पूर्ण शंभर गुणांचा पेपर नक्कीच सोडवला असता! दहा गुणाचा अख्खा प्रश्न मला उत्तर येत असूनही वेळेअभावी लिहू शकलो नाही याची रूखरुख वाटते, किती लवकरच तीन तास संपतात गं! असे प्रसंग आपल्या पैकी बहुतेकांवर कधी ना कधी तरी येत असतात त्यावेळी वाटतं आपल्यासाठी घड्याळाचे काटे थोडे धिम्या गतीने चालावेत !
एखाद्या सीमेवरच्या सैनिकाला बऱ्याच कालावधीनंतर घरी जाण्यासाठी रजा मिळत असते तेव्हा त्या रजेचा कालावधी लवकर संपूच नये असे घरच्यांना वाटणे स्वाभाविक आहे. रजा संपत येते तेव्हा वाटतं, किती भराभर संपला हा अख्खा महिना ! मग वेळ खरंच कुणासाठी थांबत नाही याची खात्री पटते. घरातील कुटुंबीयांची तेव्हा चलबिचल सुरु होते पण त्याप्रसंगी तेथे भावनेला थारा नसतो! तेव्हा भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ठरते अन् रजा संपताच आपल्या नियोजित ठिकाणी जाणे बंधनकारक असल्याने त्या सैनिकाला घर सोडावेच लागते! या भूतलावरती प्रत्येकावर काही काही प्रसंग असे ओढवतात की त्यावर काही इलाज नसतो. जसे कुटुंबीयातील अगदी जवळच्या नातेवाईकाचा अचानक होणारा मृत्यू ! त्यावेळी "अहो हे काय त्याचं जाण्याचं वय होतं? त्याला खूप शिकून मोठा माणूस व्हायचं होतं ! त्याला जीवनात बरंच काही करायचं होतं!" असे बोल आपल्या कानी पडतात. अशाप्रसंगी सगळंच जिथल्या तिथं राहून जातं अन् दुर्दैवानं कुटुंबीयांच्या आशाआकांक्षा भंगतात ! याउलट काही प्रसंग असेही येतात... कधी कधी खूपच प्रतिकूल परिस्थितीत एखाद्या मोठ्या जीवघेण्या प्रसंगातून आपल्या प्रिय व्यक्तीची अगदी आश्चर्यकारकरित्या सुटका होते !
जीवन हे क्षणभंगूर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे पण ते कशाप्रकारे जगावं याबाबत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या धारणा असणे स्वाभाविक आहे. काही काही व्यक्ती आपली कामे झटपट वेळेच्या आत व्हावीत यासाठी फारच आग्रही असतात तर काही बेफिकीर वृत्तीचे लोक "अरे यार इतनी भी जल्दी क्या है? देखेंगे कल करेंगे!" अशीही मुक्ताफळे उधळणारे असतात. अशा महाभागांना ना वेळेचे महत्त्व पटलेलं असतं ना माणसांची किंमत असते !
आजकाल प्रचंड वाहतुकीमुळे सगळ्यांनाच आपल्या कामावर लवकर पोहचण्याची घाई असते. मग एखाद्या दिवशी अचानक कुणाचा तरी दुर्दैवानं अपघात होतो अन् ध्यानीमनी नसताना दवाखान्यात दिवस मोजण्याची त्याच्यावर पाळी येते! मग तेथे फक्त चार पाच दिवस झाले तरी त्याला वाटायला लागते... "किती दिवस झालेत इथं अडकून पडलोय आपण, हे प्लॅस्टर कधी काढणार कुणास ठाऊक? कधी सुटका होणार यातून आपली?" तेव्हा वेळ जात नसल्यामुळे त्याचा जीव अगदी मेटाकुटीस येतो अन् त्याची अवस्था अशी होते की, 'काटो तो कटते नहीं ये दिन ! रातभी गुजरती नहीं तारे गिन गिन!"
काही वेळेस टीव्हीवरची एखादी मालिका इतकी उत्कंठा वाढवणारी असते की, वाटतं हा प्रसंग आजच पूर्ण बघायला मिळावा पण होतं काय की जेव्हां आपली उत्सुकता ताणली जाते अगदी तेव्हाच त्या दिवसाचा तो भाग (एपिसोड) संपतो! त्यावेळी सहज वाटून जातं ह्या मालिकेसाठी जास्त वेळ द्यायला हवा होता! असे बरेच प्रसंग आपल्या जीवनात सातत्याने येत असतात, जेव्हा वाटतं घड्याळाचे काटे जरा हळूहळू पुढे सरकावेत..! सायंकाळी पालक आपल्या मुलांना एखाद्या बागेत सहज विरंगुळा म्हणून घेऊन जातात. मुलंही खेळण्यात रमतात. बागेतील निरनिराळ्या खेळणीवर (घसरगुंडी इत्यादी ) तल्लीन होऊन त्यांचा खेळ सुरु असतो. मग अचानक शिट्टीचा फुर्रर्र आवाज कानी पडतो, पाठोपाठ रखवालदार ओरडतो "चला निघा वेळ संपलीय, बाग बंद करायची आहे आता!" मग त्या मुलांना साहजिकच वाटतं... आत्ताच तर आपला खेळ सुरु झाला अन् लगेच वेळ संपली, अजून थोडा वेळ खेळू दिलं असतं तर..!
तुरुंगात असलेला एखादा कैदी आपल्या हातून घडलेल्या कर्माचा पश्चात्ताप करत शिक्षा भोगत असतो ! तेव्हा तो एक एक दिवस मोजत असतो. त्यावेळी आपली वर्तणूक व राहणीमान तो चांगले ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतो... शिक्षेत काही सुट मिळून लवकर सुटका होणार या आशेने! त्याला भेटायला तेथे जवळचे नातेवाईक किंवा मित्र वगैरे येत असतात. मग तब्येतीची विचारपूस, भेटीची औपचारिकता पूर्ण होते. अशातच घरचा डबा घेऊन त्याची प्रिय व्यक्ती भेटायला येते मग त्यांच्या गप्पा रंगतात! थोडा वेळ ते आपल्याच भावविश्वात रमतात अन् अचानक कानावर कडक आवाज पडतो..." मिलनेका वक्त खत्म हुआ है... जल्दी करो और बाहर निकलो!" तेव्हा दोघांनाही नकळत वाटून जातं..."समय तू धीरे धीरे चल...!!"
... विनोद श्रा. पंचभाई
9923797725
No comments:
Post a Comment