Friday, April 19, 2024

मुंह मे राम बगल मे छुरी...

 मुंह मे राम बगल मे छुरी...


   'मुहं मे राम बगल मे छुरी' ही हिंदी भाषेतील म्हण बहुतेकांनी ऐकली असणारच. स्पष्ट शब्दात सांगायचं तर रामाच्या नावाचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करणाऱ्यांची संख्या आपल्या समाजात दिवसेंदिवस वाढत आहे. फक्त राजकीय क्षेत्रातच नाही तर इतर क्षेत्रात देखील रामाचं नाव घेऊन आपली पोळी भाजून घेणे सर्रासपणे सुरू आहे. सांस्कृतिक अन साहित्य क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. रामाला स्वतःचा आदर्श मानणारे काही तथाकथित, स्वतःला सुसंस्कृत समजणारे महाभाग रावणासारखं वागताना दिसतात. असहाय नवोदितांची फसवणूक करताना दिसतात. अशावेळी 'मुहं मे राम बगल मे छुरी' ही म्हण तंतोतंत लागू पडते!


      शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात सुद्धा फार वेगळी स्थिती नाही. लाखो रुपये डोनेशन घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या शिक्षण संस्थाची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा शिक्षण संस्थामधील शिक्षणाच्या दर्जाबद्दल तर बोलायलाच नको. खरंतर 'स्टँडर्ड' समजण्यात येणाऱ्या या शिक्षण संस्थामधील शिक्षकांनाच आज शिक्षणाची गरज आहे हे दुर्दैवाने नमूद करावे लागते. 

    परम आदरणीय आणि श्रद्धेय समजण्यात येणारे क्षेत्र म्हणजे अध्यात्मिक क्षेत्र!  दुर्दैवाने आजकाल या क्षेत्रात पुढाकार घेणारे साधू आहेत की संधीसाधू हेच कळत नाही. अशा संधीसाधू बुवांनी देशभर आपापली दुकानं थाटली असल्याचं आढळून येईल. भोळ्याभाबळ्या जनतेला आपल्या मार्गी लावून, या भोंदू बुवांच्या भाषेत सांगायचं झालं तर भक्तिमार्गाला लावून त्यांची लुबाडणूक केली जाते. पीडित भक्त आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडेल या आशेने अशा बुवांच्या बोलण्यावर विश्वास (की आंधळा विश्वास ) ठेवतो. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन पूर्ण श्रद्धेने त्यांची सेवा करतो. कालांतराने त्याला स्वतःची फसवणूक झाल्याचं लक्षात येतं त्यावेळी बराच उशीर झालेला असतो!

         आजकाल बऱ्याच बुवा, बाबांचे वेगवेगळे चॅनल्स , वेबसाईट्स निघालेल्या आहेत. त्यावर मोठमोठी आश्वासनं दिली जातात. एखाद्याला पुत्र प्राप्ती होत नसेल, व्यवसायात सतत अपयश येत असेल अथवा मनासारखी नोकरी मिळत नसेल तर त्यावर हमखास उपाय सुचविले जाणार अशा जाहिराती करण्यात येतात. एका युट्युब चॅनलवर तर चक्क...

'मोक्ष प्राप्त करने के लिये हमारा चॅनल लाईक करके सब्सक्राईब किजीये!' असं ऐकायला मिळते, आता बोला! सत्संग, संत समागम या भक्तिमय शीर्षकाखाली किती मलिदा गोळा केला जातो आणि सरळ साध्या पद्धतीने जीवन जगणाऱ्या गोरगरीब लोकांची कशी पिळवणूक केली जाते याची आपल्या विशाल देशात मोजदादच नाही! बरं आपल्या देशातील सामान्य जनता इतकी भोळी भाबडी आहे की... कसलीही शहानिशा न करता या भोंदू बाबांच्या भूलथापांवर चटकन विश्वास ठेवते आणि त्याच्या नादी लागते. त्यावेळी त्यांची आपल्या कुठल्याही हितचिंतकांचे सावधगिरीचे बोल ऐकण्याची मनस्थिती नसते! त्यामुळेच 'मुहं मे राम बगल मे छुरी' या धूर्त नीतीने वागणाऱ्या अशा संधीसाधू बुवा, बाबांचे फावते. सामान्य जनतेला आपली घोर फसवणूक झाल्याचं कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते!

      अशा सर्वच क्षेत्रातील तथाकथित महाभागाना प्रभू श्रीराम सदबुद्धी देवो हीच प्रार्थना! शेवटी 'मन से जो रावन निकाले राम उसके मन मे है!' हेच खरं! 

... विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

    9923797725

No comments:

Post a Comment