‘‘नाही, मला हीच वही पाहिजे... हाच रंग मला आवडला आहे, त्या नंदूला दुसरी वही घ्यायला सांग!’’ अनुने आरडाओरडा करत घर जणू डोक्यावर घेतलं होतं. आई तिला समजावताना आता वैतागली होती! शेवटचा उपाय म्हणून समजावणीच्या सुरात म्हणाली,
‘‘अगं असं काय वेड्यासारखं वागतेस अनु? तू नंदूची दिदी ना! मग आपल्या छोट्या भावाला एका क्षुल्लक वहीसाठी का रडवतेस? देऊन टाक ती वही त्याला, हवं तर तू दुसरी कुठलीही घे!’’
‘‘नाही, अजिबात नाही! मी ही वही घेणार म्हणजे घेणारच..’’ अनु ठामपणे म्हणाली.
‘‘अगं असं करु नकोस... आपल्या छोट्या भावाला रडवून तुला काय मिळणार आहे? आपण मुलीच्या जातीनं ऐकून घ्यायला हवं ना...! हे बघ, माझं ऐक जरा. नाहीतर बाबा आल्यावर आणि त्यांना हे कळल्यावर मलाच बोलणी खावी लागणार!’’ आईने तिला इशारा दिला.
‘‘म्हणजे काही झालं तरी मीच ऐकून घ्यायचं प्रत्येकवेळेस असंच ना..!’’ अनु फणकार्यानं म्हणाली आणि तिने रागारागानं हातातील वही नंदूकडे भिरकावून दिली. वही मिळाल्यामुळे नंदू टाळ्या पिटू लागला.
अनुच्या बालमनाला आता थोडं कळायला लागलं होतं... आपण मुलगी आहोत म्हणूनच आई आपल्याला सारखी रागावत असते आणि नंदूचे नको तेवढे लाड करते... नुसतं लाडोबा करून ठेवलंय त्याला... जे हवं ते त्याला लगेच मिळतं... सगळे हट्ट पुरवले जातात त्याचे... त्यामुळेच किती हट्टी झालाय नंदू इतक्यात! आईला समजत कशी नाही इतकी साधी गोष्ट?
विचार करता करता तिला एकदम शाळेतील कदम बाईंची आठवण आली. किती छान शिकवतात सगळ्यांना... कसलाही त्रागा नाही की चिडचिड नाही. सतत हसतमुख चेहर्याच्या कदम बाई वर्गात आल्या की कसं प्रसन्न वाटतं. त्यांचा सहवास खूपच हवाहवासा वाटतो. त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द ऐकण्यासाठी सर्वांचेच कान आतूर असतात. त्या बोलतात तेव्हा असं वाटतं त्यांनी बोलतच रहावं आणि आपण फक्त ऐकत रहावं!
संध्याकाळी बाबा घरी आले. त्यांनी येताना सोबत आईस्क्रीम आणलं होतं. छोटा नंदू दिसताच बाबांनी त्याला उचलून घेतलं. त्याचे पापे घेतले, लाड केले आणि म्हणाले... ‘‘आज आम्ही आमच्या नंदूसाठी आईस्क्रीम आणलंय... कोणतं फ्लेवर खाणार आमचा नंदूबाळ? मँगो की स्ट्रॉबेरी...’’
‘‘बाबा, स्ट्रॉबेरी मला हवंय!’’ शेजारी उभी असलेली अनु पटकन म्हणाली.
‘‘अनु, आधी आपल्या अभ्यासाचं आवर आणि ते दप्तर भरून ठेव! मगच आईस्क्रीम मिळणार!’’ आतल्या खोलीतून बाहेर येत आई तिला बोलली.
‘‘हो बेटा अनु, तू आपला अभ्यास पूर्ण करून घे. आईस्क्रीम काय, ते सगळ्यांसाठीच आणलंय... नंतर तुला मिळणारच आहे.’’ बाबा तिला समजावणीच्या सुरात म्हणाले.
‘‘पण बाबा मला स्ट्रॉबेरी हवंय. ते माझ्यासाठी ठेवणार ना...?’’ अनुनं बाळबोधपणानं विचारलं.
‘‘नाही दिदी... स्ट्रॉबेरी मीच घेणार, माझ्यासाठीच आणलंय बाबांनी...’’ नंदू मध्येच बाबांना बिलगत ओरडला.
‘‘बघा हो बाबा, हा कसा करतोय... जे मला हवं असतं ना, नेमकं त्यासाठीच हा हट्ट करतो..’’ अनु त्रासिक चेहरा करून म्हणाली.
‘‘अगं पण तू दिदी आहेस ना त्याची... त्याला जरा समजून घेत जा... तुझा धाकटा भाऊ आहे तो... त्याच्यासाठी ऐकून घ्यायला हवंस तू!’’ बाबा तिची समजूत काढत म्हणाले.
‘‘हो का! म्हणजे नेहमी मीच समजून घ्यायला हवं...’’
‘‘पण मी म्हणते, मीच का ऐकून घ्यायचं सदा न कदा?’’
‘‘मी मुलगी आहे म्हणूनच ना!’’ रडवेल्या स्वरात अनु उद्गारली!
‘‘अगं किती त्रागा करतेस आणि छोट्याशा गोष्टीचा बाऊ करून काय मिळणार आहे तुला? नंदूला रडताना बघून आनंद मिळणार आहे का तुला?’’ आई करारीपणे म्हणाली.
‘‘आणि मला रडायला आलं तर मी रडायचं पण नाही... मी फक्त प्रत्येक वेळी ऐकूनच घ्यायचं असंच ना?’’ अनु आवेशात म्हणाली.
‘‘आता कसं समजावायचं या पोरीला काही कळत नाही! तुम्हीच बघा आता आपल्या लेकीकडे... माझी कामं पडली आहेत... हिच्या नादात सगळं आवरायचं राहिलं... स्वयंपाकाचं पण बघायला हवं!’’ बाबांकडे बघत आई म्हणाली आणि आतल्या खोलीत निघून गेली.
अनु हिरमुसल्यासारखी बसून होती. तिचं आता अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. काहीतरी करायचं म्हणून ती पुस्तकं आणि वह्या वेगवेगळ्या करत होती. मग दप्तर भरायला लागली. नंतर आपल्या आवडत्या चित्रकलेच्या वहीची पानं उलटत असताना तिला झाशीच्या राणीचं चित्र दिसलं. राणी घोड्यावर बसलेली असून घोडा धावतो आहे असं ते चित्र होतं. या चित्राबद्दल तिच्या मनात नेहमी कुतूहल जागं व्हायचं कारण कदम बाईंनी शाळेत झाशीच्या राणीच्या पराक्रमाची गाथा सगळ्यांना ऐकवली होती! कधीकधी तिला वाटायचं आपणही या राणीसारखं घोड्यावर स्वार होऊन खूप वेगानं फेरफटका मारावा. घोडा नाही तर निदान छोटी सायकल तरी आपल्याजवळ असावी अशी कल्पना ती रंगवायला लागली. मग या वाढदिवसाला बाबांना सायकलच घेऊन मागायची असं तिनं ठरवलं.
आज नंदूचा पाचवा वाढदिवस होता. नेमका रविवारीच वाढदिवस आल्यानं बाबा आणि अनु दोघंही घरीच होते. आईची नेहमीप्रमाणे लगबग सुरू होती. बाबांनी सजावट करायला आणलेले फुगे आणि रंगीबेरंगी पट्ट्या पिशवीतून बाहेर काढल्या अन् फुगे फुगवायला सुरुवात केली. अनु सुद्धा त्यांना मदत करु लागली. फुगा फुगवताना एखादा फुगा फुटला की नंदूला खूप मजा वाटायची आणि तो टाळ्या वाजवायचा. नंतर फुगे आणि रंगीबेरंगी पट्ट्या लावून घरी मस्त सजावट करण्यात आली. वाढदिवस असल्याने नंदू आज खूप खुश होता. त्याच्यासाठी बाबांनी तीनचाकी सायकल आणली होती.
सायंकाळी अनुच्या घरी बच्चेकंपनी गोळा झाली. नंदूचा वाढदिवस घरगुती पद्धतीनं धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. आईने त्याला औक्षण करून ओवाळले. अनु आणि छोट्या छोट्या बालमित्रांनी नंदूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि टाळ्या वाजवल्या. बाबांनी त्याचे कौतुक करत त्याच्यासाठी आणलेल्या तीनचाकी सायकलवर बसवले. तेव्हा नंदूचा आनंद गगनात मावत नव्हता. मग सगळ्यांनी खूपच धमाल केली.
सकाळी शाळा असल्याने अनु लवकरच उठली. कालचा दिवस नंदूच्या वाढदिवसात गेल्याने अनुचा वह्या, पुस्तकांचा पसारा तसाच पडला होता. तिनं आपलं दप्तर आवरलं. थोडं वाचन केलं. मग आईची हाक कानावर पडताच आंघोळीसाठी उठली. तेवढ्यात तिचं लक्ष नंदूच्या तीनचाकी सायकलकडे गेलं. नंदू पलीकडच्या खोलीत झोपलेला होता. आईचं आपल्याकडे लक्ष नाही हे बघूनच अनु तीनचाकी सायकलवर बसायला गेली, मात्र अचानक तिला आईच्या ओरडण्याचा आवाज आला... ‘‘अगं काय चाललंय तुझं... आज शाळेला दांडी मारण्याचा विचार आहे का? चल पटकन आंघोळ उरकून घे. बस येईलच इतक्यात...’’
‘‘हो गं, आलेच!’’ अनु कसंबसं बोलली आणि आंघोळीला पळाली.
पहिलाच तास कदम बाईंचा असल्याने मुलींनी वर्ग गच्च भरला. अनु आणि तिची जिवलग मैत्रीण रेणू यांची आपसात कुजबुज सुरू होती. काही मुली वाचनात दंग होत्या तर काही एकमेकींच्या खोड्या काढण्यात मग्न होत्या. तेवढ्यात कदम बाई वर्गाकडे येत असल्याची मुलींना चाहूल लागली आणि सगळ्या अगदी शांत झाल्या. बाई वर्गात येताच सर्वांनी उठून त्यांना अभिवादन केले. बाईंनी हसत मुखाने त्याचा स्वीकार केला आणि उपस्थिती घ्यायला सुरुवात केली.
‘‘मुलींनो, आज आपण बालकवींची कविता शिकणार आहोत... कोण सांगणार बालकवींचं पूर्ण नाव?’’
कदम बाईंनी प्रश्न विचारायचा अवकाश, अनु लगेच उठून उभी राहिली आणि म्हणाली... ‘‘त्र्यंबक बापूजी ठोंबरे..!’’
‘‘शाब्बास अनु... बैस खाली!’’ कदम बाईंनी तिला हातानं इशारा करत बसायला सांगितले आणि शिकवायला सुरुवात केली...
‘‘बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे निसर्ग कवी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या बर्याच कविता लोकप्रिय ठरलेल्या आहेत. तर आपण आज त्यांची गाजलेली कविता ’आनंदी आनंद गडे’ वाचणार आहोत... तसेच गाणारही आहोत! माझ्या सोबत तुम्हाला गायला आवडेल ना?’’
‘‘हो’’ सगळ्यांनी एका सुरात होकारार्थी आवाज काढून वर्ग दणाणून सोडला!
मग कदमबाईंनी तालासुरात कविता गायला सुरुवात केली... आनंदी आनंद गडे... इकडे तिकडे चोहीकडे
नंतर लगोलग वर्गातील मुलींनी ताल धरला!
शाळा सुटल्यावर अनु शाळेच्या मुख्य द्वाराजवळ उभी होती. तिचे बाबा तिला घ्यायला येणार होते. एक एक करत सर्व मुली शाळेबाहेर पडल्या. अनु मात्र चातकासारखी आपल्या बाबांची वाट बघत थांबली होती. शेवटी कंटाळून ती जवळ पडलेल्या एका बाकावर बसली. काही वेळाने तिला स्कुटरवर बाबा येताना दिसले. सोबत नंदू पण होता. बाबा जवळ येताच वाट पाहून कंटाळलेली अनु म्हणाली... ‘‘काय हो बाबा, किती उशीर? सर्व मुली कधीच निघून गेल्या अन् मी बसली तुमची वाट बघत!’’
‘‘अगं मी वेळेतच पोहचणार होतो पण तेवढ्यात हा नंदू आला ना घरी त्याच्या ’किलबिल’ मधून! मग याचा गणवेश बदलायला, खायला, आवरायला थोडा वेळ लागला... बरं चल बैस पटकन मागच्या सीटवर... जाऊया घरी!’’
खरंतर अनुला बाबांसोबत स्कुटरवर पुढं उभं रहायचं होतं. मात्र तिथं नंदू उभा असल्याने ती काहीच बोलली नाही आणि मुकाटपणे मागच्या सीटवर बसली!
येत्या 5 तारखेला अनुचा वाढदिवस होता पण त्याच दिवशी तिचे बाबा त्यांच्या ऑफिसच्या कामाने मुंबईला जाणार होते. घरी सगळ्यांंनाच माहिती होतं अनुचा वाढदिवस 5 ऑगस्टला आहे ते...! तिचे बाबा सायंकाळी घरी आल्यावर म्हणाले... ‘‘बरं का अनु, येत्या सोमवारी म्हणजे तुझ्या वाढदिवसाच्या दिवशीच मला महत्त्वाच्या कामासाठी मुंबईला जायचंय... तिथून परतायला रात्री उशीर पण होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं, आपण तुझा वाढदिवस 4 तारखेला म्हणजे रविवारीच करुया...!’’
‘‘हो... चालेल बाबा... पण मला दुचाकी सायकल घेऊन हवी आहे वाढदिवसाला... घेणार ना बाबा?’’
बाबा काही बोलणार तेवढ्यात अनुची आई म्हणाली, ‘‘अगं अनु, काय करणार आहेस तू आतापासून सायकल घेऊन...? शाळेत जायला रिक्षा आहेच की! काही नको सायकल वगैरे... हवं तर बाहुली घेऊया एखादी!’’
आईचं निर्वाणीचं बोलणं ऐकून अनु लगेच उत्तेजित होऊन म्हणाली... ‘‘नकोय मला बाहुली... मला सायकलच हवी... बाबा सांगा ना तुम्ही आईला..!’’
‘‘अगं असं काय करतेस वेड्यासारखं... तू दिदी आहेस ना, मग थोडं ऐकून घेत जा ना... तुझ्यासाठी सायकल कधीतरी घ्यावीच लागणार आहे पण आता नको... मागच्याच महिन्यात नंदूच्या वाढदिवसाला बराच खर्च झालाय...!’’ बाबा तिची समजूत काढत म्हणाले.
‘‘म्हणजे नंदूला काय हवं नको तेच बघायचं तर... माझं काय, मी दिदी आहे ना म्हणून मी गप्प बसायचं... मीच सगळं ऐकून घ्यायचं असंच ना?’’
अनु लगेच फणकार्यानं बोलली आणि रडायला लागली.
‘‘अनु, आता बस झालं... गप्प बैस जरा, उगाच छोट्या छोट्या गोष्टीचा बाऊ करत जाऊ नकोस तू... सायकल काय तुला आज ना उद्या मिळणारच आहे... माझं ऐकून घे जरा आणि ते दप्तर लवकर आवरून घे..!’’
आई तिच्याजवळ गेली अन् तिचे डोळे पुसत म्हणाली.
‘‘हो... हो! मीच ऐकून घेते सगळं... बाबा मला काही नकोच माझ्या वाढदिवसाला, खरंच काही नको. मी आता काहीच मागणार नाही!’’ रागारागाने अनु म्हणाली.
‘‘अगं! अनु बाळ, एवढा राग चांगला नसतो... तू आता शांत हो बरं... जा हात तोंड धुवून ये! आपण जेवायला बसूया सगळे!’’ बाबांनी तिच्या पाठीवर हात फिरवत समजावलं.
मग काही न बोलता ती आपलं दप्तर आवरु लागली... मात्र तिच्या मनात विचार आलाच... नेहमी मीच का ऐकून घ्यायचं...?
- विनोद श्रा. पंचभाई
९९२३७९७७२५

Khup Chhan katha..
ReplyDeleteधन्यवाद..
ReplyDelete